विजयकुमार सैतवाल
जळगाव : खारीकचे आगार म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानचे व भारताचे व्यापारी संबंध बिनसल्यापासून भारतात खारीकची आयात थांबल्याने तिचे भाव थेट दुप्पटीहून अधिक प्रमाणात वाढले आहे. गेल्या वर्षी १५० रुपये प्रती किलोवर असलेली खारीक यंदा तब्बल ३५० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. दरम्यान, पाकिस्तानातूनच येणाऱ्या सेंधी मीठाचेही भाव तीनपटीने वाढून ते २० रुपयांवरून ६० रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.
पुलवामा हल्ल्यापासून भारत-पाकिस्तानचे व्यापारी संबंध जवळपास संपुष्टात आले आहेत. त्यामुळे भारतातून पाकिस्तानात जाणाºया अनेक वस्तूंची निर्यात थांबण्यासह पाकिस्तानातून भारतात येणाºया अनेक वस्तूंची आयातही थांबली आहे. याचा परिणाम म्हणून दोन्ही देशात त्या-त्या वस्तूंचे दर कडाडले आहेत. यामध्ये खारीकचाही समावेश असून थंडीला सुरुवात होताच खारीकच्या वाढीव भावाचा परिणाम जाणवू लागला आहे.
४०० रुपयांचा पल्ला
थंडीच्या दिवसात डिंक, मेथीच्या लाडूमध्ये खारीकचा वापर हमखास केला जातो. त्यामुळे लाडूसाठी तसेच दुधासोबत घेण्यासाठी या दिवसात खारीकला मोठी मागणी वाढते. गेल्या वर्षी याच थंडीच्या हंगामात खारीकचे भाव १५० रुपये प्रती किलो होते. मात्र पुलवामा घटनेनंतर भारत-पाक व्यापारी संबंध संपुष्टात आले. त्यामुळे तेव्हापासून खारीकची आयात थांबली. परिणामी खारीचे भाव थेट ४०० रुपये प्रती किलोवर पोहचले. मात्र आता त्यात थोडी नरमाई येऊन ते ३५० रुपये प्रती किलोवर आले आहेत. यात दर्जानुसार २८० रुपयांपासूनही खारीक उपलब्ध आहे. मात्र चांगल्या दर्जाच्या खारीचे भाव ३५० रुपये प्रती किलोवर आहेत.
आवकवर अवलंबून राहणार भाव
हिवाळ््यामध्ये खारीकची मागणी दुपटीवर पोहचले. एरव्ही दररोज एकट्या जळगावात ५०० किलो विक्री होणाºया खारीकची ही विक्री थंडीच्या दिवसात दररोज एक टनावर पोहचते. एकट्या जळगावात दररोज एक टन खारीकची विक्री होते. त्यामुळे मागणी व आयात पाहता सध्या वाढलेले हे भाव कितीवर पोहचतात हे तिच्या आवकवरच अवलंबून राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
....तर पाकिस्तानातून खारीकची आयात निम्म्यावर येईल
सध्या पाकिस्तानमधील पंजाब व सिंध प्रांतातून खारीकची आयात होते. गुजरातच्या कच्छ भागात त्यासाठी पोषक वातावरण असल्याने त्या भागात सध्या खारीकची लागवड करण्यात आली असून हे उत्पादन वाढले तर पाकिस्तानातून आयात होणाºया या खारीकचे प्रमाण निम्म्यावर येईल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानच्याच लाहोर परिसरातील खदाणीमधून उत्पादीत होणाºया सेंधी मीठाचीही आयात भारतात होते. त्याच्याही आवकवर परिणाम होऊन ते २० रुपये प्रती किलोवरून ६० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.
खारीकची आवक कमी झाल्याने तिचे भाव दुपटीपेक्षा अधिक वाढले आहे. गेल्या वर्षी खारीक १५० रुपये प्रती किलो होती ती आता २८० ते ३५० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. या सोबतच सेंधी मीठाचेही भाव २० रुपये प्रती किलोवरून ६० रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.
- सुरेश बरडिया, सुकामेवा विक्रेते.
पाकिस्तानातून खारीकची आयात थांबल्याने भाव दुप्पट, १५० रुपयांवरून ३५० रुपये प्रती किलोवर
भारत-पाक व्यापारी संंबंधातील बेबनावाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:00 PM2019-11-24T13:00:08+5:302019-11-24T13:00:51+5:30