पणजी : विजय मल्ल्याच्या गोव्यातील बंगल्याचा येत्या १९ आॅक्टोबर रोजी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वतीने लिलाव करण्यात येणार आहे. विजय मल्ल्याच्या कंपन्यांकडे थकलेले कर्ज वसूल करण्यासाठी हा लिलाव करण्यात येत असून, बंगल्याची किंमत ८५ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
गोव्याच्या कांदोळी बीचवर असलेला हा बंगला मे २0१६ मध्ये बँकेने आधी हस्तगत व नंतर जप्त केला होता. एकूण १२,३५0 चौरस मीटर जागेवर उभारलेल्या या बंगल्यात तीन मोठ्या बेडरूम आणि एक विशाल दिवाणखाना आहे. अभिजात कोरीव काम केलेले सागवानी फर्निचर त्यात आहे. गोव्याचे प्रसिद्ध डीन डीक्रुझ यांनी हा बंगला डिझाइन केला आहे. एसबीआय कॅप ट्रस्टी कंपनीकडे लिलावाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २६ व २७ सप्टेंबर आणि ५ व ६ आॅगस्ट या काळात बंगला पाहण्यासाठी खुला आहे.
किंगफिशर एअरलाइन्सकडे थकलेल्या ६,९६३ कोटींच्या कर्जापोटी हा बंगला जप्त करण्यात आला आहे. या कर्जासाठी मल्ल्याने वैयक्तिक हमी दिलेली आहे. त्याच्या मालकीची दुसरी कंपनी युनायटेड ब्रेवरीज सह हमीदार आहे.
बँकांनी मुंबई विमानतळाजवळ असलेले किंगफिशर हाउस हे मुख्यालय लिलावात काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी खरेदीदार पुढे आला नाही. लिलावकर्त्या बँकांनी त्याची किंमत आधी १५0 कोटी ठेवली होती, नंतर ती १३५ कोटी करण्यात आली, तरीही ही मालमत्ता विकली गेली नाही. किंगफिशरचा पक्षी असलेला ब्रँड विकण्याचाही प्रयत्न बँकांनी केला होता. त्याची किंमत ३६६ कोटी ठेवण्यात आली होती. त्यालाही कोणी गिऱ्हाईक मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर गोव्यातील किंगफिशर विला विकला जाईल की नाही, याबाबत संशय व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
किंगफिशर व्हिला लिलावात
विजय मल्ल्याच्या गोव्यातील बंगल्याचा येत्या १९ आॅक्टोबर रोजी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वतीने लिलाव करण्यात येणार आहे.
By admin | Published: September 14, 2016 05:50 AM2016-09-14T05:50:51+5:302016-09-14T05:50:51+5:30