Join us  

CNG-PNG चे दर कमी होण्याची शक्यता; कोणत्या ग्राहकांना होईल सर्वाधिक फायदा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 12:17 PM

मिळालेल्या माहितीनुसार, किरीट पारीख समिती पुढील आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे.

नवी दिल्ली : सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. पुढील आठवड्यानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. किरीट पारीख समिती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला सादर करू शकते, अशी माहिती सीएनबीसी-आवााजने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. दरम्यान, सर्वसामान्य ग्राहकांसाठी सीएनजी आणि पीएनजीचे योग्य दर काय असावेत, यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, किरीट पारीख समिती पुढील आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालात सामान्य ग्राहकांसाठी सवलतीच्या गॅसच्या किमतींची शिफारस केली जाऊ शकते. जर असे झाल्यास सीएनजी, पीएनजीचे थेट ग्राहकांसह गॅसवर आधारित खते आणि गॅसवर आधारित वीजनिर्मितीच्या ग्राहकांसाठी ही एक दिलासादायक बातमी असणार आहे.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, किरीट पारेख समिती आपल्या अहवालात 6-7 डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (mmbtu)च्या मर्यादेची ​​शिफारस करण्याची शक्यता आहे. समितीने या अहवालाला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवार 31 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या भागधारकांची बैठक बोलावली आहे. हा अहवाल 2 भागात असणार आहे. त्यात सीजीडी तसेच खत आणि वीज प्रकल्पांसाठी स्वतंत्र शिफारसी असतील.

वर्षातून दोन वेळा किंमत निश्चित केली जातेसरकार दर सहा महिन्यांनी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी नैसर्गिक वायूची किंमत निश्चित करते. अमेरिका, कॅनडा आणि रशिया सारख्या गॅस अतिरिक्त देशांच्या गॅसच्या किमती विचारात घेऊन गॅसच्या किमती ठरवल्या जातात. दरम्यान, रशिया-युक्रेन संकटामुळे जागतिक संकट निर्माण झाले आहे. याच कारणास्तव 1 ऑक्टोबर रोजी सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत 40 टक्क्यांनी विक्रमी वाढ केली होती. नैसर्गिक वायूची किंमत 6.1 डॉलरवरून 8.57 डॉलर प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (mmbtu) पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांवर होत आहे.

टॅग्स :व्यवसाय