देशातील अनेक मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांमध्ये असलेल्या वादाची चर्चा झाली होती. परंतु आता देशातील आणखी एक मोठ्या कॉर्पोरेट घराण्याचा म्हणजेच किर्लोस्कर कुटुंबातील एक वाद समोर आला आहे. दरम्यान, १३० वर्ष जुन्या वारशाचं हे प्रकरण आहे. संजय किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखालील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडनं आरोप केलाय की त्यांचे बंधू अजय आणि राहुल किर्लोस्कर यांच्या अंतर्गत येणाऱ्या चार कंपन्यांनी त्यांच्या १३० वर्षांच्या वारसा हिसकावून घेण्याचा आणि जनेतची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
परंतु दुसऱ्या पक्षाकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. कुटुंबातील वाद वाढल्यानंतर केबीएलनं बाजार नियामक सेबीला एक पत्र लिहिलं आहे. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड, किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनी आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिडेटनं केबीएलचा वारसा हिसकावरून घेण्याचा अथवा तो दाबण्याचा प्रयत्न केल्याचं सेबीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. इकॉनॉनिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
वारसा हिसकावण्याचं प्रकरण
दरम्यान, केबीएलचा वारसा आपल्या वारसा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचंही सेबीला पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, याबाबत किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून सेबीला लिहिलेल्या पत्रात काही तथ्यात्मक चूका असल्याचं सांगण्यात आलं. संपूर्ण पत्रकात केबीएलचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. तर किर्लोस्कर ब्रदर्सचा वारसा हिसकावून घेण्याची गोष्ट तर दूरच आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं.
दाव्यावर प्रश्नचिन्ह
यावर्षी १६ जुलै रोजी अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखालील पाच कंपन्यांनी आपल्याशी निगडीत व्यवहार नव्या पद्धतीनं सुरू करण्याच्या प्रक्रियेची घोषणा केली होती. या कंपन्यांच्या नव्या ब्रँडची ओळख आणि रंगांची घोषणा करण्यात आली होती. याशिवाय नवा किर्लोस्कर लोगोही निवडण्यात आला होता. हा रंग १३० वर्ष जुन्या नावाचा वारसा दर्शवतो, असं घोषणेदरम्यान सांगण्यात आलं होतं.
१३० वर्ष जुना वारसा मानण्यास नकार
पहिल्या पक्षाच्या आरोपावर आक्षेप घेत केबीएलनं सेबीला पत्र लिहिलं आहे. केओईएल, केआयएल, केपीसीएल आणि केएफआयएलची स्थापना अनुक्रमे २००९, १९७८, १९७४ आणि १९९१ मध्ये झाली आहे. त्यांना १३० वर्षांचा वारसा नाही, असं केबीएलनं आक्षेप घेत सेबीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अशातच आता सेबी यावर काय भूमिका घेत आहे, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.