मुंबई - देशाच्या औद्योगिकीकरणात पथदर्शी म्हणून ख्यातकीर्त असलेल्या पुण्याच्या किर्लोस्कर उद्योगसमुहाची मालकी असलेले किर्लोस्कर कुटुंब सध्या आपसातील कोर्टकज्ज्यांमध्ये अडकले आहे. कुटुंबाच्या मालमत्तांवर नियंत्रण मिळविण्यासाठी एका बाजूला संजय तर दुसऱ्या बाजूला राहुल आणि अतुल ही तीन किर्लोस्कर भावंडे न्यायालयांमध्ये परस्परांविरुद्ध लढत आहेत. यातील संजय हे किर्लोस्कर ब्रदर्स या समुहातील सर्वात महत्वाच्या १३० वर्षे जुन्या असलेल्या कंपनीचे प्रमुख आहेत, तर राहुल व अतुल यांच्याकडे किर्लोस्कर इंडस्ट्रिज लि. या कंपनीची धूरा आहे.राहुल, अतुल व त्यांच्या कुटुंबियांनी किर्लोस्कर ब्रदर्सचे त्यांच्याकडील शेअर आपल्याच ताब्यातील किर्लोस्कर इंडस्ट्रिजला विकताना ‘इन्सायडर ट्रेडिंग’ केल्याच्या आरोपांवरून ‘सेक्युरिटिज अॅण्ड एक्स्चेंज बोर्डा’ने (सेबी) नव्याने चौकशी सुरु केली आहे. या दोन्ही भांवानी या आरोपांचा इन्कार केला आहे. मात्र किर्लोस्कर ब्रदर्सने निवृत्त न्यायाधीश न्या. बी. एन. श्रीकृष्ण व एएनझेड लिगल या दोन लॉ फर्मकडून करून घेतलेल्या त्रयस्थ ‘फॉरेन्सिक आॅडिट’मध्ये त्यांनी कंपनीविषयीच्या आतील माहितीचा उपयोग करूनच हा व्यवहार केला, यावर शिक्कामोर्तब केले गेले होते.दुसरीकडे अतुल व राहुल यांनी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीविरुद्ध कंपनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली असून तेथे त्यांची इतर बाबींखेरीज संजय यांना कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावरून दूर करावे, अशी मागणी आहे.संजय यांचा असा दावा आहे की, कुटुंबात वाटणीसंबंधीचा जो समझोता झाला त्याचे पालन करून आपण किर्लोस्कर ब्रदर्समधील लाखो शेअर आपल्या भावांना दिले आहेत. उलट राहुल व अतुल यांनीच त्या कौटुंबिक समझोत्याचे उल्लंघन केल्याने आपले ७५० कोटी रुपयांचे नुसकान झाले, असा संजय यांचा आरोप असून त्याच्या नुसकान भरपाईसाठी त्यांनी आपल्या या दोन भावांविरुद्ध पुण्याच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.कुुटुंबातील कोणीही उद्योग-व्यवसाय करताना घरातील दुसºया सदस्याशी स्पर्धा करायची नाही, असे या कौटुंबिक समझोत्याचे एक महत्वाचे कलम होते. उदा, एखादा भाऊ पंपांचे उत्पादन करत असेल तर दुसºयाने त्याच धंद्यात शिरायचे नाही. परंतु राहुल व अतुल यांनी किर्लोस्कर इंडस्ट्रिज ही स्पर्धक कंपनी खरेदी करून याचे उल्लंघन केले, असा संजय यांचा आरोप आहे.किर्लोस्कर कुटुंबाने पुणे व कर्नाटकात हरिहर येथे किर्लोस्कर इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडिज ही शिक्षणसंस्था स्थापन केली आहे. तेथे व्यवस्थापन शिक्षणाचे प्रगत अभ्यासक्रम घेतले जातात. या संस्थेतील कथित गैरव्यवहार, गैरव्यवस्थापन, जमिनी बळकावणे व जमिनी अवैधपणे भाडेपट्टयाने देणे असे आरोप करत संजय यांनी राहुल व अतुल यांच्याविरुद्ध तीन स्वतंत्र प्रकरणे दाखल केली आहेत. त्यापैकी एका प्र्रकरणात न्यायालयातीन आदेश न पाळल्याबद्दल अलीकडेच प्रतिवादींना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.अतुल व राहुल यांच्या ताब्यातील किर्लोस्कर प्रोप्रायटरी लि. या कंपनीकडून ट्रेडमार्क परत मिळविण्यासाठी संजय यांनी आणखी एक वेगळा दिवाणी दावा दाखल केला आहे. किर्लोस्करांचे ट्रेÞडमार्क अन्य कोणाच्या हाती पडून त्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी तयंचे सुरक्षितपणे जतन करण्यासाठी किर्लोस्कर प्रोप्रायटरी ही वेगळी कंपनी मुद्दाम स्थापन केली गेली होती. त्यानुसार किर्लोस्कर समुहातील सर्व कंपन्यांनी आपापले ट्रेडमार्क या कंपनीकडे दिले व ही कंपनी त्या त्या कंपनीला ते स्वतंत्र करार करून वापरण्याची परवानगी देते. या कराराचे नुतनीकरण करताना प्रोप्रायटरी कंपनीने घातलेल्या अटी किर्लोस्कर ब्रदर्सला मान्य नाहीत. त्यामुळे आपले प्रोप्रायटरी कंपनीकडे दिलेले ट्रेडमार्क परत घेण्यासाठी संजय यांच्या कंपनीने पुण्याच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
उद्योजक किर्लोस्कर कुटुंबात आपापसातील कोर्टबाजीने तेढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 5:25 AM