Join us

तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 9:22 AM

टपरवेअर (Tupperware) ही कंपनी किचनवेअर वस्तू बनवण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या लंच बॉक्स, पाण्याच्या बाटल्या आणि इतर वस्तूंचा अनेक लोक मोठ्या प्रमाणात वापर करतात.

टपरवेअर (Tupperware) ही कंपनी किचनवेअर वस्तू बनवण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या लंच बॉक्स, पाण्याच्या बाटल्या आणि इतर वस्तूंचा अनेक लोक मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसंच स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी कंपनीचे एअरटाइट प्लॅस्टिक कंटेनर जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला सापडेल. पण आता ही कंपनी स्पर्धेच्या शर्यतीत पिछाडीवर पडली आहे. कंपनीवर ७०० मिलियन डॉलर्स (सुमारे ५८६० कोटी रुपये) कर्ज आहे. विक्री कमी झाल्यानं आणि कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यानंतर कंपनीनं आपल्या काही उपकंपन्यांसह अमेरिकेत दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे.

विक्रीवर झाला परिणाम

टपरवेअर ही अमेरिकेतील कंपनी आहे. याची सुरुवात १९४६ मध्ये झाली. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एअरटाईट प्लॅस्टिकच्या भांड्यांसाठी टपरवेअर हा लोकप्रिय ब्रँड आहे. कंपनीची उत्पादनं भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये उपलब्ध आहेत. इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही वर्षांत या कंपनीला बाजारपेठेतील ग्राहकांमध्ये आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. उत्पादनांच्या विक्रीत घट झाल्याने कंपनीला आता मोठा तोटादेखील सहन करावा लागत आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला असल्याची प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरी अॅन गोल्डमन यांनी दिली.

कच्च्या मालाच्या किंमतीनं वाढवलं टेन्शन

कोरोनानंतर प्लॅस्टिक रेझिनसारख्या अनेक आवश्यक कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली होती. तसंच कंपनीत काम करणाऱ्या लोकांच्या पगारातही वाढ झाली होती. याशिवाय मालवाहतुकीचा खर्चही वाढला. या गोष्टींमुळे कंपनीचं मार्जिन लक्षणीयरीत्या कमी झालं आणि कंपनी तोट्यात गेली. ऑगस्टमध्ये कंपनीनं रोख रकमेच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर कंपनीवर प्रचंड कर्ज असल्याची माहितीही कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना दिली होती. यामुळे कंपनीला आता व्यवसाय चालविणं अवघड होत आहे.

किती आहे कर्ज?

कंपनीनं अमेरिकेच्या न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. निधी उभारता आला नाही तर कंपनी दिवाळखोर होऊ शकते, असे संकेत कंपनीनं गेल्या वर्षी दिले होते. कंपनीवर ७०० मिलियन डॉलर्स (सुमारे ५८६० कोटी रुपये) कर्ज आहे. 

टॅग्स :व्यवसायअमेरिका