नवी दिल्ली - कधी कधी पैशांची देवाण-घेवाण करताना चुकून एखादी नोट फाटली जाते. नोट चुकून फाटली की पैसे फुकट गेले असा अनेकांचा समज होतो. मात्र जुन्या किंवा फाटलेल्या नोटा या रिझर्व्ह बँकेकडून बदलून घेता येतात. कधी कधी फाटलेल्या नोटेचा अर्धा भागच शिल्लक राहतो पण असं असलं तरी तुम्ही रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळवू शकता. तुमच्याकडे नोटेचा जितका भाग असेल त्याप्रमाणात रिझर्व्ह बँक पैसे परत देते.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अर्धवट फाटलेल्या नोटेचेही मूल्य असते. आता प्रत्येक नोटेसाठी हा नियम वेगवेगळा आहे. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 ते 20 रुपये मूल्यांची नोट अर्धवट फाटली असेल तर त्याचे अर्धे मूल्य मिळू शकत नाही. अशा स्थितीत या नोटांचे पूर्ण मूल्य दिले जाते. पण 50 रुपये ते 2000 रुपयांच्या नोटा फाटल्या असतील तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळू शकते. जाणून घेऊया या संबंधीचा नियम.
1 - एका रुपयाची नोट ही 61.11 सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असते. या नोटेचा 31 सेंटीमीटर स्क्वेअर हिस्सा असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.
2 - दोन रुपयांची नोट 67.41 सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असते. या नोटेचा 34 सेटींमीटर हिस्सा असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.
5 - पाच रुपयांची नोट 73.71 सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असते. या नोटेचा 37 सेंटीमीटरचा हिस्सा असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.
10 - दहा रुपयांची नोट 86.31 सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असते. या नोटेचा 44 सेटींमीटर हिस्सा असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.
20 - वीस रुपयांची नोट 92.61 सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असते. या नोटेचा 47 सेंटीमीटर हिस्सा असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.
50 ते 2000 रूपयांच्या फाटलेल्या नोटांसाठी वेगळा नियम आहे. हे पैसे कसे मिळतात ते जाणून घेऊया
50 - पन्नास रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटांबाबत वेगवेगळे नियम आहेत. जुन्या नोटेचा 43 सेंटीमीटर स्क्वेअर आणि नव्या नोटेचा 36 सेंटीमीटर स्क्वेअर हिस्सा असेल तर अर्धी रक्कम परत मिळते.
100 - शंभर रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटांबाबत देखील वेगळे नियम आहेत. जुन्या नोटेचा 46 सेंटीमीटर स्क्वेअर आणि नव्या नोटेचा 75 सेंटीमीटर स्क्वेअर हिस्सा असेल तर अर्धी रक्कम परत मिळते.
200 - दोनशे रुपयांची नोट 96.36 सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असते. नोटेचा 78 स्क्वेअर मीटर भाग असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात. तर 39 सेंटीमीटर स्क्वेअर भाग असल्यास अर्धेच पैसे मिळतात.
500 - पाचशे रुपयांची नोट 99.00 सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असते. नोटेचा 80 सेंटीमीटर भाग असल्यास पूर्ण पैसे मिळतील. पण तुमच्याकडे केवळ 40 सेंटीमीटर स्क्वेअर हिस्सा असेल तर अर्धेच पैसे परत मिळतील.
2000 - दोन हजार रुपयांची नोट 109.56 सेंटीमीटर स्क्वेअर आकाराची असते. या नोटेचा 88 सेंटीमीटर भाग असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. तर 44 सेंटीमीटर हिस्सा असल्यास तुम्हाला अर्धेच पैसे मिळतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.