नवी दिल्ली – जर तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील किंवा कुठेही या नोटा घेत नसेल कारण फाटलेल्या नोटा घेण्यास दुकानदारही नकार देतो. त्यामुळे तुम्ही घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला या नोटांऐवजी चांगली नोट मिळू शकते. टेपनं चिटकवलेल्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयनं नियम बनवला आहे. बँकेच्या नियमांनुसार, या नोटा तुम्ही कशा बदलू शकता, त्या पुन्हा कशा मिळवू शकता म्हणजे टेपनं चिटकवलेल्या नोटा चलनात वापरु शकता याबाबत जाणून घेऊया.
काय आहेत बँकेचे नियम?
भारतीय रिझर्व्ह बँकच्या २०१७ च्या एक्सचेंज करेंसी नोट नियमांनुसार, जर एटीएममधून तुम्हाला फाटलेल्या नोटा मिळाल्या असतील तर त्या तुम्ही सहजपणे बदलू शकता. कुठलीही सरकारी बँक नोटा बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही. अशा नोटा बँकेला बदलून द्याव्या लागतात. त्यास मनाई करु शकत नाहीत.
‘अशी’ आहे नोट बदलण्याची प्रक्रिया
जर तुमच्याकडे नोटांचे तुकडे असतील तरीही बँक बदलून देईल. फाटलेल्या नोटेचा तुकडा गायब झाला असेल तरी एक्सेंज होऊ शकतं. जर कुठलीही नोट पूर्णपणे फाटली असेल, संपूर्ण भाग कट झाला असेल, नोट जळाली असेल तर फक्त आरबीआयच्या ऑफिसमध्ये ती बदलली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरुन सरकारी बँक, खासगी बँकेच्या करंसी चेस्ट अथवा आरबीआय इश्यू ऑफिसमध्ये जाऊ बदलता येऊ शकते.
पूर्ण पैसे परत मिळणार
तुमच्या नोटेची अवस्था आणि व्हॅल्यूवर ते निर्भर करतं तुम्हाला पूर्ण पैसे भेटणार की नाही. नोट हलकीशी फाटलेली असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील. परंतु नोट जास्त फाटली असेल तर काही टक्केच पैसे परत मिळतील. उदा. ५० रुपयांहून कमी व्हॅल्यू असलेल्या नोटेचा मोठा तुकडा ५० टक्क्याहून अधिक असेल तर त्या नोटेचे पूर्ण पैसे परत मिळतील. जर ५० रुपयांहून अधिक व्हॅल्यू असलेल्या नोटेचा सर्वात मोठा तुलनेने ८० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नोट बदलल्यानंतर पूर्ण पैसे मिळतील.
दुसरीकडे, जर ५० रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटेचा सर्वात मोठा तुकडा सामान्य नोटेच्या ४० ते ८० टक्क्याच्या मध्ये असेल तर तुम्हाला त्या नोटेच्या निम्मे मूल्य मिळेल. जर एकाच नोटेचे दोन तुकडे असतील ज्याचे मूल्य ५० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि हे दोन तुकडे सामान्य नोटेच्या ४० टक्क्यांपर्यंत असतील तर तुम्हाला नोटेच्या पूर्ण मूल्याच्या बरोबरीचे मूल्य मिळेल. १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० आणि २० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात अर्धी किंमत मिळणार नाही. म्हणजेच, आता तुम्ही तुमचे पैसे न गमावता बदलू शकता.
तक्रार कशी करावी?
कोणत्याही बँकेने तुम्हाला फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास, तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category वर तक्रार करू शकता. ही लिंक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. अनेक अहवालांनुसार, कोणतीही बँक एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. तसेच, असे असतानाही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारे बँकेला १० हजारांपर्यंतचे नुकसानही भरावे लागू शकते.