पवन देशपांडे, सहायक संपादकक्टोबर २००९ मध्ये जर तुम्ही केवळ पाच पैसे गुंतवले असते तर नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याचे मूल्य जवळपास ४५ लाख रुपये एवढी झाली असती... आश्चर्य वाटेल आणि ‘हे असं कुठे होऊ शकते का?’ असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.. पण ही जादू आहे बिटकॉइनची. बिटकॉइन म्हणजे सर्वांत पहिले क्रिप्टोकॉइन अर्थात आभासी चलन. याचा पहिला व्यवहार जेव्हा झाला तेव्हा त्याची किंमत केवळ पाच पैसे होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये ती सर्वोच्च पातळीवर गेली आणि आता मंदी असतानाही १३ लाखांवर आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये किती मोठा नफा होऊ शकतो, याचे हे साधे उदाहरण. दहा वर्षांत एका बिटकॉइनने अनेकांना लखपती, कोट्यधीश केले. पण ही क्रिप्टो बाजाराची एक बाजू, जी सर्वांनाच कायम आकर्षित करते. मात्र आपण गुंतवलेल्या रकमेवर मोठे आणि लवकर लाभ मिळावेत, अशी हाव ठेवून गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटकाही बसत आहे. कारण यातील धोकाही वाढला. तो आता प्रकर्षाने जाणवतोय. गेल्या पाच वर्षांत यातील फसवणूक अनेक पटींनी वाढली. २०१६ मध्ये क्रिप्टोसंबंधीचे ७०४ घोटाळे झाले होते. २०२१ मध्ये नऊ हजारांवर फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. यावरून लक्षात येईल की यात किती मोठा धोका आहे. सहा वर्षांत क्रिप्टोच्या फसवणुकीच्या ३४ हजारांहून अधिक तक्रारी आहेत.
यात अनेक जणांचे परत मिळालेच नाहीत. क्रिप्टोचे व्यवहार करण्याची सुविधा देणाऱ्या एक्स्चेंजमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा घोटाळा उघडकीस आला. ते एक्स्चेंज अक्षरशः गुंतवणूकदारांचे पैसे अडकवून बंद पडले. ज्याचे हे एक्स्चेंज होते तो तर कंगालच झाला. एकेकाळी त्याच्याकडे १५ अब्ज डॉलर एवढी संपत्ती होती. ती आता ०.५ अब्ज डॉलर इतक्यावर आली आहे. एक्स्चेंजचा मालक जसा कंगाल झाला तसाच तिथे पैसा अडकवून ठेवलेले गुंतवणूकदारही फसले. त्यामुळे क्रिप्टो करन्सी जेवढी आकर्षक वाटत असली तरी तेवढीच धोकादायकही आहे. काही महिन्यांपूर्वी ‘लुना’ कॉइन अचानक कोसळले. सुरुवातीच्या काळात या आभासी चलनाने गुंतवणूकदारांना मालामाल केले. सुरुवातीला ५० ते ७० रुपयांचे हे आभासी चलन गेल्या वर्षी आठ ते नऊ हजार रुपयांवर गेले होते. म्हणजे १०० पटांहून अधिक नफा यात मिळाला. पण, हे चलन झटक्यात खाली आले. आज त्याची किंमत अर्ध्या पैशांपेक्षाही कमी आहे.
या दोन उदाहरणांवरून यातील धोका लक्षात आला असेलच... क्रिप्टोतील गुंतवणूक म्हणूनच जेवढी फायद्याची ठरू शकते, तेवढीच ती धोक्याचीही ठरू शकते... हे कायम लक्षात असू द्या.
- यात विनाअभ्यास गुंतवणूक करू नये, असा सल्ला यातीलच तज्ज्ञ देतात.- यावर कोणाचे नियंत्रण नाही. अनेक देशांनी यासंदर्भात कायदे करण्यासाठी पावलेही उचलली आहेत. - आपला पैसा गेला तर त्याची दाद फारशी कुठे मागता येत नाही, पैसा परत मिळेल याची शाश्वती नसते.- आपला पासवर्ड सोपा ठेवू नका आणि कोणाला शेअरही करू नका. - गुंतवणूक करताना एवढीच रक्कम गुंतवावी, जी आपल्या हातून गेली तर फार मोठा फटका बसणार नाही.