Join us

श्रीमंत हाेण्यासाठी नेमके काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 3:17 PM

आर्थिक नियोजन करताना नेमके काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्यावे.

चंद्रकांत दडस, उपसंपादकअनेक लोकांना असे वाटते की, आपण इतका पैसा कमावतो मात्र आपल्याकडे शिल्लक काहीच राहात नाही. एखादा शेजारी किंवा मित्र प्रगतिपथावर जाताना दिसतो. त्यांच्या यशाचे रहस्य असते, योग्य आर्थिक नियोजन. त्यामुळेच आपणही आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करून त्याची अंमलबजावणी केल्यास यश नक्की मिळेल. यावेळी आर्थिक नियोजन करताना नेमके काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्यावे.

आर्थिक ध्येय गाठण्यासाठी... आपले ध्येय ठरवा -तुम्ही कशासाठी बचत करत आहात हे तुम्हाला माहिती नसल्यास नियोजन करणे कठीण होते. कौटुंबिक सुटीचे नियोजन करण्यापासून ते अल्प मुदतीची बचत की दीर्घ कालावधीसाठी आपण नियोजन करत आहोत, हे सर्व एकदा तपासून घ्या.

विमा घेऊन धोका टाळा -गेल्या काही वर्षांमध्ये अचानक हार्ट अटॅक किंवा इतर कारणांमुळे मृत्यू येणे, आजारी पडणे या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कुटुंबावर मोठा आर्थिक ताण येतो. हे टाळण्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर आरोग्य विमा आणि टर्म इन्शुरन्स घ्या. 

कर नियोजन -करांचे नियोजन केल्याने तुमच्या पैशाची बचत करण्यात मदत होऊ शकते. कर नियोजन न केल्यास  नाहक आपले पैसे जातात. त्यामुळे कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या पैशांची बचत करता येते.

या चुका करू नका -कर्ज सापळ्यात अडकणे आपल्या जगण्याची पद्धत इतरांसारखी करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकता. जगण्याची पद्धत इतरांसाठी बदलू नका. एकाचवेळी अनेक ठिकाणी कर्जे घेतल्यास आणि योग्य नियोजन न झाल्यास कर्ज आपल्यासाठी सापळा होतो. त्यातून बाहेर पडणे अवघड होते. त्यामुळे अनावश्यक कारणासाठी कर्ज घेण्याचा मोह टाळा.

नियोजन अपडेट न करणे -तुमच्या आर्थिक योजना अधूनमधून बदलल्या पाहिजेत. तुमची आर्थिक योजना तुमच्या जीवनातील ध्येयांप्रमाणे विकसित झाली पाहिजे. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा मागोवा ठेवा आणि त्यामध्ये आवश्यक फेरबदल करा.

गरज ओळखा, इच्छा टाळा -प्रत्येक वेळी खरेदी करताना आपल्याला त्या वस्तूची खरेच गरज आहे का याचा विचार करा. केवळ इच्छा आहे म्हणून खरेदी कराल तर तोटा ठरलेला आहे. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायचीच असेल तर ३० दिवस वाट पाहा. त्यानंतरही तुम्हाला ती वस्तू घेण्याची इच्छा असेल तरच ती घ्या.

टॅग्स :पैसाव्यवसाय