पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनतेची डोकेदुखी वाढली आहे. त्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरानं गृहिणींचं गणितही कोलमडलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांनी वाढ झाली आहे. पण तुमच्या घरात येणारा सिलिंडर तुम्हाला ३०० रुपयांनी स्वस्त मिळाला तर? हो, हे शक्य आहे. यासाठीची नेमकी प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात. (know how to link your aadhar card for lpg subsidy pradhanmantri ujjwala yojana)
घरगुती गॅस सिलिंडरवर केंद्र सरकार अनुदान देतं. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरवर मिळणारं अनुदान १७४.८० रुपयांनी वाढवून आता ३१२.८० रुपये इतकं करण्यात आलं आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हालाही ३१२.८० रुपयांनी सिलिंडर स्वस्त मिळू शकतो.
आधारकार्ड आवश्यक
पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी तुमचं आधारकार्ड या योजनेशी जोडलं गेलेलं असलं पाहिजे. ते जर जोडलेलं नसेल तर तुमच्या बँक खात्यात अनुदान मिळणार नाही. आधार कार्डच्या माध्यमातून एलपीजी अनुदान मिळविण्यासाठी तुमचं आधार कार्ड सर्वात आधी तुमच्या बँक अकाऊंटशी जोडलेलं असलं पाहिजे. यासोबतच तुमचा मोबाइल क्रमांक देखील गॅस एजन्सीसोबत रजिस्टर असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड लिंक नसेल किंवा मोबाइल नंबर रजिस्टर नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही.
रजिस्ट्रेशन कसं करावं?
आधार कार्ड तीन पद्धतीनं रजिस्टर करता येतं. मोबाइल नंबरच्या साहाय्यानं, दुसरं म्हणजे एसएमएसच्या माध्यमातून आणि तिसरा पर्याय म्हणजे UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. जेव्हा तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर होईल त्यानंतर UID Aadhar number टाइप करुन तुमच्या गॅस एजन्सीच्या नंबरवर मेसेज पाठवायचा आहे. तुमचा नंबर रजिस्टर होताच तुम्हाला मेसेज येईल.
कोणत्या क्रमांकावर कॉल करावा?
मोबाइल क्रमांकाच्या साहाय्यानं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इंडेन गॅस एजन्सीचा टोल फ्री क्रमांक १८०० २३३३ ५५५५ यावर फोन करुन कस्टमर केअरशी संपर्क साधून तुमचा आधार क्रमांक तुम्हाला रजिस्टर करता येईल.
UIDAI च्या संकेतस्थळावरुन करा रजिस्ट्रेशन
तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनं आधार कार्डला गॅस अनुदान योजनेशी जोडायचं असेल तर UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊनही रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुम्हाला UIDAI च्या संकेतस्थळावर तुमचं नाव, पत्ता, योजना, गॅस ड्रस्ट्रीब्युटर ही सर्व माहिती नोंदवून तुम्ही गॅस सिलिंडर अनुदानासाठी नोंदणी करू शकता.