Lokmat Money > बिझनेस न्यूज > Go First पहिली नाही! देशात हवाई सेवांची दैना; ३० वर्षांत २७ विमान कंपन्या बंद पडल्या

Go First पहिली नाही! देशात हवाई सेवांची दैना; ३० वर्षांत २७ विमान कंपन्या बंद पडल्या

भारतीय हवाई सेवांमध्ये दोन डझनहून अधिक कंपन्यांनी आपल्या सेवा बंद केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 07:15 PM2023-05-04T19:15:08+5:302023-05-04T19:15:48+5:30

भारतीय हवाई सेवांमध्ये दोन डझनहून अधिक कंपन्यांनी आपल्या सेवा बंद केल्या आहेत.

know how many airlines bankrupt shutting down in india from last 30 years | Go First पहिली नाही! देशात हवाई सेवांची दैना; ३० वर्षांत २७ विमान कंपन्या बंद पडल्या

Go First पहिली नाही! देशात हवाई सेवांची दैना; ३० वर्षांत २७ विमान कंपन्या बंद पडल्या

Go First या परवडणाऱ्या दरात विमान सेवा देणाऱ्या कंपनीचे चाक आर्थिक गर्तेत रूतले असून, कंपनीने राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाकडे (एनसीएलटी) दिवाळखोरीचा अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. विमानांमधील तांत्रिक अडचणींमुळे कंपनीच्या ताफ्यातील ६१ पैकी ३० विमाने इंजिनमध्ये त्रुटी असल्याने जमिनीवर आहेत. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने आगामी दोन दिवसांसाठीही विमान उड्डाणे कंपनीने स्थगित केली आहेत. मात्र, अशा प्रकारे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेली Go First ही पहिली कंपनी नाही. देशभरात गेल्या ३० वर्षांत तब्बल २७ कंपन्या बंद पडल्या आहेत. 

खासगी विमान कंपन्यांना देशांतर्गत उड्डाणाला १९९४ मध्ये सर्वप्रथम परवानगी देण्यात आली. त्या वर्षापासून, अधिकृत आकडेवारीनुसार किमान २७ अनुसूचित विमानसेवा एकतर बंद करण्यात आल्या किंवा त्यांचे अधिग्रहण किंवा अन्य कंपन्यांमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल्स अँड ट्रेड लिंक लिमिटेड ही १९९४ मध्ये सुरू झालेली देशातील पहिली खासगी विमान कंपनी होती. जवळपास दोन वर्षांच्या परिचालनानंतर, नोव्हेंबर १९९६ मध्ये तिचे कामकाज बंद पडले. त्याच वर्षी, मोदीलुप्त लिमिटेडनेदेखील गाशा गुंडाळला.

किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडला २०१२ मध्ये उड्डाण थांबवण्यास भाग पाडले गेले

विजय मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडला २०१२ मध्ये उड्डाण थांबवण्यास भाग पाडले गेले. त्यापूर्वी, २००८ मध्ये, किंगफिशर एअरलाइन्सने देशातील वाजवी दरातील हवाई प्रवासाचे प्रणेती डेक्कन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड (एअर डेक्कन) ही कंपनी विकत घेऊन विलीन करून घेतली होती.एअर कार्निव्हल प्रायव्हेट लिमिटेड, एअर पेगासस प्रायव्हेट लिमिटेड, रेलिगेअर एव्हिएशन लिमिटेड, एअर कोस्टा आणि क्विकजेट कार्गो एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्या २०१७ मध्ये बंद पडल्या.

लुप्तान्सा कार्गो इंडिया प्रा. लिमिटेडने २००० सालामध्ये उड्डाणे करणे बंद केले

डेक्कन कार्गो अँड एक्सप्रेस लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड २०१४, आर्यन कार्गो एक्स्प्रेस २०११, पॅरामाउंट एअरवेज २०१०, एमडीएलआर एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड २००९, जगसन एअरलाइन्स लिमिटेड २००८ आणि इंडस एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड २००७ या क्रमाने बंद पडलेल्या विमानसेवा आहेत. १९९६ मध्ये एनईपीसी मायकॉन लि. आणि स्कायलाइन एनईपीसी लि. (पूर्वीची दमानिया एअरवेज लि.) या दोन कंपन्या १९९७ मध्ये बंद पडल्या. लुप्तान्सा कार्गो इंडिया प्रा. लिमिटेडने २००० सालामध्ये उड्डाणे बंद केली.

दरम्यान, लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जेट एअरवेजने एप्रिल २०१९ मध्ये ऑपरेशन्स बंद केले. तसेच त्या आधी, जेट लाइटने (पूर्वाश्रमीची सहारा एअरलाइन्स) २०१९ मध्ये कामकाज बंद केले. तीन हवाई सेवा – झूम एअर नावाने कार्यरत झालेली झेक्सस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड; डेक्कन चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड आणि एअर ओडिशा एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे कामकाज २०२० मध्ये बंद झाले तर हेरिटेज एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडने २०२२ पासून उड्डाणे बंद केली.

 

Web Title: know how many airlines bankrupt shutting down in india from last 30 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.