Join us

जाणून घ्या मोदींच्या राजवटीत कुठल्या क्षेत्रात किती नोकऱ्या निर्माण झाल्या, मॅन्युफॅक्चरींग सेक्टरला जबर झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 11:01 AM

रोजगार निर्मिती हे अजूनही नरेंद्र मोदी सरकार समोरचे एक मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारने आठ महत्वाच्या क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा सर्वेक्षणद्वारे आढावा घेतला.

ठळक मुद्देशिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एप्रिल ते जून 2017 या काळात 1.3 लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली. एप्रिल 2016 पासून आठ क्षेत्रात मिळून 4.8 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली.

नवी दिल्ली - रोजगार निर्मिती हे अजूनही नरेंद्र मोदी सरकार समोरचे एक मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारने आठ महत्वाच्या क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा सर्वेक्षणद्वारे आढावा घेतला. त्याचे आकडे नुकतेच जाहीर केले.  मागच्यावर्षी एप्रिल ते जून या काळात आठ क्षेत्रात 64 हजार नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली. पण चिंता करायला लावणारी बाब म्हणजे याच काळात उत्पादन क्षेत्रात 87 हजार नोकऱ्या कमी झाल्या आहेत. याचाच अर्थ नरेंद्र मोदींचे 'मेक इन इंडिया'चे स्वप्न कोसो दूर आहे. कारण मेक इन इंडियाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली तर नोकऱ्या कमी होण्याऐवजी वाढतील. 

लेबर ब्युरोने केलेल्या सर्वेक्षणानुसार शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एप्रिल ते जून 2017 या काळात 1.3 लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली. उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, हॉटेल, आयटी/बीपीओ या क्षेत्रात मिळून 66 हजार नोकऱ्या कमी झाल्या. शिक्षण क्षेत्र सर्वाधिक नोकऱ्या निर्मितीचे सेक्टर ठरले. एप्रिल ते जून 2017 या कालावधीत 99 हजार रोजगार शिक्षण क्षेत्रात तयार झाले. याच कालावधीत आरोग्य क्षेत्रात 31 हजार रोजगार निर्माण झाले. 

एप्रिल 2016 पासून आठ क्षेत्रात मिळून 4.8 लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली. यातील निम्म्या नोकऱ्या 1.7 लाख शिक्षण क्षेत्रात, आरोग्य 1 लाख नोकऱ्या तयार झाल्या. मागच्या 15 महिन्यात रोजगार निर्मितीमध्ये 2.3 टक्क्यांची वाढ झाली असून वार्षिक वाढ 1.8 टक्के आहे. लोकसंख्या, पदवीधर युवावर्गाचा विचार करता ही वाढ पुरेश नाही. मागच्या 15 महिन्यात उत्पादन क्षेत्रात रोजगार वाढीचा वेग 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे.  

टॅग्स :नोकरीनरेंद्र मोदी