भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) काही दिवसांपूर्वी २ हजार रूपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यांची कायदेशीर मान्यता मात्र कायम राहणार आहे. दरम्यान, लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेची चर्चा आहे. ज्यांच्या सहीशिवाय नोटा छापल्या जात नाहीत, ज्यांच्या नोटांबाबत मोठे निर्णय होतात, त्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा पगार आणि अधिकार तुम्हाला माहीत आहेत का?
रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या वेतानाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या आर्थिक वर्षादरम्यान त्यांची महिन्याचं वेतन २.५ लाख रुपये होते. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचं मासिक वेतन २.५ लाख रुपये महिना होतं. यानंतर रिझर्व्ह बँकेच्या डिप्टी गव्हर्नरना २.२५लाख रूपये वेतन मिळतं. एक्झिक्युटिव्ही डायरेक्टरचं मासिक वेतन २.१६ लाख रुपये आहे.
कोणत्या सुविधांचा समावेश?
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना त्यांच्या वेतनाशिवाय आणखीही सुविधा मिळतात. त्यांना सरकारकडून घर, गाडी, ड्रायव्हर आणि अन्य सुविधाही मिळतात. शक्तिकांत दास यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. १९८० च्या बॅचचे आयएएस शक्तिकांत दास यांनी २०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार सांभाळला होता. २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला.