नवी दिल्ली- देशातील 2.38 लाखांपैकी 1 लाख 13 हजार एटीएम मार्चअखेर बंद करावी लागतील, असा इशारा ‘कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री’ने बुधवारी दिला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं एटीएम मशिन बंद झाल्यास त्याचा रोजगारावर विपरित परिणाम होणार आहे. एटीएम बंद झाल्यानं अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. तसेच देशातील आर्थिक सेवा प्रणालीही विस्कळीत होणार आहे.येत्या 4 महिन्यांत देशभरात जवळपास 1.10 लाख म्हणजे अर्ध्याहून अधिक एटीएम बंद होणार आहेत. जर असं झालं तर पूर्ण देशाला याची झळ सोसावी लागणार आहे. लोकांना एटीएममधून कॅश काढताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एवढंच नव्हे, तर एटीएम बंद झाल्यामुळे फक्त पैसे काढण्याबरोबरच अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. केंद्रीय बँकेनंही गेल्या काही दिवसांपूर्वीच गाइडलाइन जारी केली आहे. ज्यात देशभरातल्या एटीएम मशिनमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अद्ययावत करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे एटीएम मशिन व्यवस्थापनाचा खर्च वाढत आहे.
- ग्रामीण भागात पडणार जास्त प्रभाव- CATMiची चिंता जर सत्यात उतरली, तर याचा सर्वाधिक प्रभाव ग्रामीण भागावर पडणार आहे. ग्रामीण भागात जास्त करून व्यवहार हा रोख रकमेनं होतो. अशातच एवढ्या मोठ्या संख्येनं एटीएम मशिन बंद झाल्यास गावाकडच्या भागात पैशाची चणचण भासणार आहे.
- अनेकांच्या नोकऱ्या जाणार- CATMiच्या मते, एवढ्या मोठ्या संख्येनं एटीएम मशिन बंद झाल्यास अनेकांच्या रोजगारावर गदा येणार आहे. या एटीएम मशिन बंद झाल्यानंतर अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. देशातली आर्थिक प्रणालीही अस्थिर होणार आहे. कारण एटीएमच्या सुविधेमुळे अनेकांना रोजगार मिळतो.
- बँका पुढे न आल्यास निर्माण होतील समस्या- एटीएम इंडस्ट्री बॉडी CATMiनं सांगितलं की, बँकांनी एटीएम कंपन्यांना सावरलं नाही, तर मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. या संस्थेच्या माहितीनुसार, एटीएम ऑपरेटर्सचा खर्च लागोपाठ वाढत चालला आहे. अशातच अनेक ऑपरेटर्सना आपलं दुकान बंद करावं लागणार आहे.
- पैसे असूनही नोटाबंदीसारखी स्थिती- बालासुब्रह्मण्यम म्हणतात, एटीएम मशिन बंद झाल्यास गुजरातमधील सूरतमध्ये पंतप्रधान जन धन योजनेतील लाभार्थी मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. सरकारी सबसिडी यांच्या खात्यात येते. जास्त करून लोक एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढतात. अशात जेव्हा एटीएम मशिनची संख्या कमी होईल, तेव्हा एटीएम मशिनच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतील. अशातच नोटाबंदीसारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
- शहरांमध्येही जाणवणार रोखीची टंचाई- जास्त करून अनेक एटीएम मशिनमधील 10 टक्के एटीएम हे वेगवेगळ्या कारणास्तव बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे काढताना मोठ्या अडचणी येऊ शकतात. एटीएम मशिन बंद झाल्यास ग्रामीण भागासह शहरी भागातली एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागणार आहेत.