Join us

बनावट QR स्कॅन करताच ठगांच्या खात्यात जातील पैसे, कसा ओळखाल खरा किंवा खोटा क्यूआर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:24 AM

आजकाल आपण बहुतेक ठिकाणी पैसे देताना क्यूआर कोडचा वापर करतो. पण आता यावरही ठगांची नजर पडली आहे.

तुम्ही Paytm, Google Pay, PhonePe किंवा इतर कोणतंही पेमेंट अॅप वापरत असाल तर तुम्हाला क्यूआर (QR) कोडचं महत्त्व चांगलंच माहित असेल. मॉलमधील कोणत्याही फूड आउटलेटमध्ये, भाजी विक्रेत्यांकडून ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आपण आजकाल क्यूआर कोड वापरतो. आम्हाला फक्त तो स्कॅन करावा लागतो आणि पैसे खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात (Digital Transaction) हस्तांतरित केले जातात. यासाठी ना वेळ लागतो ना मेहनत. पण आता क्यूआर कोडही फसवणुकीपासून वाचलेला नाही. क्यूआर कोडद्वारे फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत.

बनावट क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही फसू शकता. यामुळे तुमच्या फोनमध्ये मालवेअर डाऊनलोड केला जाऊ शकतो जो तुमच्या फोनमध्येच राहतो आणि तुमची सर्व माहिती चोरतो. बनावट क्यूआर कोड तुम्हाला अशा वेबसाइटवर घेऊन जाऊ शकतो जिथे बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.

अशी पटवू शकता ओळखखरा आणि बनावट क्यूआर कोड पहिल्याच नजरेत ओळखणं कठीण आहे. परंतु, जर तुम्ही थोडं लक्ष दिलं तर तुम्हाला बनावट क्यूआर कोड सहज ओळखता येईल. तुम्ही ज्या क्यूआर कोडवरुन पेमेंट करत असाल तो एकदा काळजीपूर्वक तपासा. जर त्याचा आकार बिघडलेला वाटत असेल किंवा त्यावर काहीतरी पेस्ट केल्याचं दिसत असेल, तर क्यूआर कोड स्कॅन करणं टाळा आणि इतर पद्धतींद्वारे पेमेंट करा.

जेव्हा तुम्ही दुकानात क्यूआर कोड स्कॅन करता आणि पेमेंट करता तेव्हा स्कॅन केल्यानंतर दुकानाचं नाव किंवा व्यक्तीचं नाव निश्चितपणे तपासा. पैसे कोणत्या नावानं जाणार हे दुकानदार किंवा सेल्समनला जरूर विचारा. जेव्हा तेच नाव दिसेल तेव्हाच पेमेंट करा. जर दुकान किंवा व्यक्तीचं नाव चुकीचं येत असेल तर याचा अर्थ काहीतरी चुकीचं आहे. पेमेंट करण्यापूर्वी, क्यूआर कोड स्कॅनर किंवा गुगल लेन्ससह क्यूआर कोड स्कॅन करा. कोडची युआरएल तुम्हाला कुठे रिडायरेक्ट करत आहे हे तुम्हाला कळेल.

टॅग्स :पैसाडिजिटल