नवी दिल्ली - डिजिटल होऊ पाहणाऱ्या इंडियामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर जलदगतीनं वाढत आहे. या दोन्ही कार्डमुळे खिशामध्ये पैसे ठेवण्याच्या कटकटीपासून मुक्तता झाली आहे. एवढंच नाही तर क्रेडिट कार्डप्रमाणे डेबिट कार्डवर ईएमआयची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या या आधुनिक सुविधांमुळे ग्राहकांचा जेवढा फायदा होत आहे, तेवढाचा त्यांना तोटादेखील सहन करावा लागत आहे. कारण तेवढ्याच गतीनं आर्थिक फसवणुकीची प्रकरणंही समोर येत आहेत. किंवा समजा डेबिट आणि क्रेडिट कार्ड असलेले तुमचं पाकिटच चोरीला गेलं किवा शॉपिंगसाठी एखाद्या दुकानात गेलेले असताना तुम्ही पाकिट तिथेच विसरलात तर यामुळे होणाऱ्या तोट्यातून तुम्ही स्वतःचा बचाव कसा करणार ?. यासाठी खालील माहिती लक्षपूर्वक वाचावी...
डेबिट आणि क्रेडिट कार्डच हरवले तर सर्वात आधी हे करा :-
- कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास सुरुवातीला आपल्या संबंधित बँकेला संपर्क साधून कार्ड ब्लॉक करण्यास सांगावे. जेणेकरुन कार्डमधून कोणताही व्यवहार होणार नाही.
- रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय)धोरणानुसार, कार्ड हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची माहिती बँकेला दिल्यानंतर त्या क्षणापासून आर्थिक फसवणूक होऊ नये, याची जबाबदारी बँकांवर असते. यादरम्यान, कार्डचा दुरुपयोग झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारे रक्कम भरावी लागणार नाही.
- बहुतांश क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना झीरो लायबिलिटी पॉलिसीची सुविधा पुरवली जाते. यामध्ये कार्डच्या नुकसान वेळेपासून झालेल्या आर्थिक घोटाळ्याचाही समावेश असतो. अशा प्रकरणात लवकरात लवकर तक्रार नोंदवावी लागते. शिवाय, बँकेलाही त्वरित संपर्क साधावा, जेणेकरुन प्रचंड प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार नाही.
- डेबिट किंवा क्रेडिट कार्ड उपलब्ध झाले असल्यास सुरुवातीला धोरणांचं लक्षपूर्वक वाचन करावं. कारण बँकांकडून नंतर नुकसानाची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे नुकसानीचा सर्व भार तुमच्या डोक्यावर येतो.
- त्यामुळे, तुमची यात काहीही चूक नाहीय, हे डेबिट किंवा क्रेडिट कार्डची सुविधा देणाऱ्यांना पटवून द्यावे लागेल.
- जर तुमचा प्रयत्न यशस्वी झाला तर बँक तुम्हाला नुकसान भरपाई देते. मात्र या प्रक्रियेमध्ये बराच कालावधी जातो.
- त्यामुळे आपल्या कार्ड संबंधीच्या सर्व माहितीबाबत नेहमी सतर्क राहा आणि ते हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास संबंधित बँकेसोबत संपर्क साधून याची माहिती त्वरित त्यांना कळवावी.