नवी दिल्ली - मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर 500 आणि 2 हजारच्या नोटा नव्याने छापण्यात आल्या. तर सरकारने 1 हजार रुपयांची नोट चलनातून बाद केली आहे. मात्र, सरकारने जारी केलेली 500 आणि 2 हजारची एक नोट छापण्यासाठी किती खर्च येतो, हे तुम्हाला माहित आहे का ?. माहिती अधिकारातून याबाबतची माहिती समोर आली आहे. त्यानुसार 500 रुपयांची एक नवी नोट छापण्यासाठी 2.57 रुपये खर्च येतो. तर 500 रुपयांची जुनी नोट छापण्यासाठी 3.09 रुपये खर्च येत होता.
रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नव्याने छापण्यात आलेल्या नोटांच्या छपाईसाठी काही प्रमाणात कमी खर्च येतो. नोटबंदी निर्णयानुसार सरकारने बंद केलेली 500 आणि 1000 रुपयांची नोट छापण्यासाठी अनुक्रमे 3.09 आणि 3.54 रुपये खर्च येत होता. तर नव्याने जारी केलेली 500 आणि 2 हजार रुपयांची नोट छापण्यासाठी अनुक्रमे 2.57 आणि 4.18 रुपये खर्च येतो. त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नवीन 500 रुपयांच्या एका नोटेच्या छपाईमागे सरकारचे 52 पैसे वाचत आहेत. तर सध्याच्या 2 हजार रुपयांच्या नोटेपेक्षा जुनी 1 हजार रुपयांची नोट छापण्यासाठी 64 पैस कमी खर्च येत होता. मात्र, सध्या सरकारने जुनी 1 हजार रुपयांची नोट बंद केली आहे. सरकारने जारी केलेल्या 500 रुपयांच्या नवीन नोटांच्या 1 हजार प्रतींसाठी 2570 रुपये खर्च येतो. तर 2 हजार रुपयांच्या नवीन नोटांच्या 1 हजार प्रतींसाठी 4180 रुपये खर्च येतो. दरम्यान, 500 रुपयांच्या जुन्या नोटांच्या 1 हजार प्रती छापण्यासाठी 3090 रुपये खर्च येत होता.