Tihin Kanta Pandey Sebi Chief: गेल्या काही दिवसांपासून बाजार नियामक सेबीच्या प्रमुखपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार यावर तर्कवितर्क लावले जात होते. परंतु आता एका नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलीये. अर्थ सचिव तुहिन कांत पांडे हे सेबीचे नवे प्रमुख असतील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं गुरुवारी या निर्णयाला मंजुरी दिली.
पांडे यांच्याकडे तीन वर्षे हा कार्यभार राहणार आहे. ते विद्यमान प्रमुख माधवी पुरी बुच यांची जागा घेतील. बुच यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. पांडे यांना अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणून मोठा अनुभव आहे. बाजारात अनेक बदल आणि आव्हानं असताना त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं आयएएस (ओआर: १९८७), वित्त सचिव आणि महसूल विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांची पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे, असं यात सांगण्यात आलंय. पारदर्शक प्रक्रियेनंतर ही नियुक्ती करण्यात आली. जानेवारी महिन्यात सरकारनं या पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ होती. अर्थ मंत्रालयानं वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीही दिल्या होत्या. या जाहिरातींमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
किती मिळणार वेतन?
सेबीचे प्रमुख पद अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं कारण ते शेअर बाजारावर देखरेख ठेवतात. गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणे ही त्यांचीही जबाबदारी आहे. सेबी प्रमुखांना भारत सरकारच्या सचिवांइतकं वेतन मिळतं. घर आणि कार शिवाय हा पगार दरमहा ५,६२,५०० रुपये आहे. पांडे यांना आर्थिक बाबींची सखोल जाण आहे. त्यांना प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवही आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या नियुक्तीमुळे बाजाराला स्थैर्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोण आहेत तुहिन कांत पांडे?
तुहिन कांत पांडे यांनी मोदी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. यापूर्वी दीपमचे (डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट) सचिव होते. अली रझा रिझवी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे DPE चा (सार्वजनिक उपक्रम विभाग) अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची अर्थ मंत्रालयात अर्थ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. विवेक जोशी आपल्या राज्यात गेल्यानंतर पांडे यांना DoPT चं (कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग) सचिव करण्यात आलं. एवढ्या जबाबदाऱ्यांमुळे ते मोदी सरकारच्या सर्वात व्यस्त सचिवांपैकी एक राहिले आहेत.
एलआयसीच्या आयपीओत महत्त्वाची भूमिका
मूळचे ओडिशाचे असलेले पांडे यांनी दीपमचे सचिव म्हणून दीर्घकाळ काम पाहिलं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये हा विभाग निर्गुंतवणुकीचा विभाग म्हणून ओळखला जात होता. एअर इंडियाचे खासगीकरण, नीलांचल इस्पात आणि एलआयसीच्या आयपीओमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. २०२१ मध्ये त्यांनी काही काळ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात सचिव म्हणूनही काम पाहिलं. याच काळात टाटा समूहाला एअर इंडिया विकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ही विमान कंपनी बऱ्याच काळापासून तोट्यात होती.
बर्मिंगहॅम विद्यापीठातून एमबीए
पांडे यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी एमबीएही केलंय. सेबीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाल्यानं बाजारात अनेक बदल पाहायला मिळू शकतात. सेबीला त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा फायदा होईल. बाजारातील स्थैर्य राखणं, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणं आणि नियमांचं पालन सुनिश्चित करणं ही त्यांची आव्हानं असतील.