मुंबई- मुंबईतील कोटक महिंद्रा बँकेने आपल्या नवीन सीईओचा शोध सुरू केला आहे. सध्या उदय कोटक यांच्याकडे बँकेच्या सीईओपदाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र आरबीआयच्या नियमानुसार त्यांना लवकरच पद सोडावे लागणार आहे. मात्र बँकेचे पुढील सीईओ उदय कोटक यांचे पुत्र जय कोटक होणार असल्याची चर्चा होती. परंतु सीईओपदाची जबाबदारी जय कोटक सांभाळणार नसल्याचं बँकेच्या एका उच्चपदावरील अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. तसेच सहा महिन्यांत नवीन सीईओची नियुक्ती होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोटक महिंद्रा बँकेत नवीन सीईओच्या नियुक्तीसाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याचा स्पष्ट अर्थ पुढील सहा महिन्यांत उदय कोटक यांच्या जागी नवे सीईओ बँकेची धुरा सांभाळतील. कोटक महिंद्रा बँकेचे पूर्णवेळ संचालक केवीएस मणियन यांनी म्हटले आहे, की बँकेचे संस्थापक जय कोटक यांचे नाव सीईओच्या शर्यतीत नाही. जय कोटक अजूनही तरुण असून गुणवत्तेच्या जोरावर काम करताना त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच बँक येत्या पाच ते सहा महिन्यांत आपल्या नवीन सीईओच्या नावाची घोषणा करेल, असंही मणियन यांनी सांगितलं.
उदय कोटक यांना पद का सोडावे लागेल?
भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांच्या सीईओंच्या कमाल कार्यकाळाबाबत नियम केले आहेत. याअंतर्गत उदय कोटक यांना सीईओ पद सोडावे लागणार असून ही जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवावी लागणार आहे. उदय कोटक यांनी १९८५ साली बँकेच्या स्थापनेपासून सीईओची जबाबदारी सांभाळली आहे.