Kotak Mahindra Bank Q1 Results: खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेनं (Kotak Mahindra Bank Q1 Financial Results) आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत, बँकेचा एकल निव्वळ नफा वार्षिक आधारावर 67 टक्के वाढीसह 3,452 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती कोटक महिंद्रा बँकेनं दिली. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेला 2,071 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
बँकेद्वारे दिलेल्या कर्जात वाढ
जून तिमाहीत बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 6,234 कोटी रुपये होते. वार्षिक आधारावर 33 टक्के वाढ झाली आहे. यावर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेनं दिलेलं कर्ज 19 टक्क्यांनी वाढून 3,37,031 कोटी रुपयांवर पोहोचले असल्याचे बँकेने सांगितले. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा 2,82,665 कोटी रुपये होता.
असेट्स क्वालिटीत सुधारणा
30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा ग्रॉस एनपीए एकूण कर्जाच्या 1.77 टक्के होता, जो मागील वर्षी याच तिमाहीत 2.24 टक्के होता. त्याचप्रमाणे नेट एनपीए 0.40 टक्के राहिला. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेचा नेट एनपीए एकूण कर्जाच्या 0.62 टक्के होता.
शेअर वधारला
बँकेचा शेअर शुक्रवारी 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 1,970 रुपयांवर बंद झाला. मागील सत्रात हा शेअर 1,956.90 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2,064.40 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1,643.50 रुपये आहे.