मुंबई : जगभरातील बाजारांमध्ये असलेली मंदीची छाया आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आर्थिक विकासावर परिणाम होण्याची भीती यामुळे शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून त्यामुळे मोठी घसरण बघावयास मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८७१ अंशांनी खाली आला तर निफ्टीलाही १४,६०० अंशांची पातळी राखता आलेली नाही.
बुधवारी सकाळी बाजार खुला झाला तोच मुळी सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी खाली येऊन. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४९,१८०.३१ अंशांवर बंद झाला आहे. त्यामध्ये ८७१.१३ अंश घट झाली. २६ फेब्रुवारीनंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही विक्रीचा जोर दिसून आला. येथील निर्देशांक (निफ्टी) २६५.३५ अंशांनी खाली येऊन १४,५४९.४० अंशांवर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही प्रत्येकी १.६९ टक्क्यांची घट झाली आहे.
३.२७ लाख कोटी रुपये बुडाले शेअर बाजारातील बुधवारच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ३.२७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारचे व्यवहार संपल्यानंतर मुंबई शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य २,०२,४८,०९४.१९ कोटी रुपयांवर आले आहे. मंगळवारच्या बाजार भांडवलमूल्यापेक्षा त्यामध्ये ३,२७,९६७.७१ कोटी रुपयांनी घट झाली आहे.