नवी दिल्ली : 'आपले ग्राहक जाणा' म्हणजेच 'केवायसी' दस्तावेजांचा गैरवापर रोखण्यासाठी नवी व्यवस्था सरकारने आणली असून, नव्या वर्षात २० जानेवारी २०२५ पासून ती अमलात येणार आहे. ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत यासाठी 'केंद्रीय केवायसी ग्राहक रेकॉर्ड रजिस्ट्री'ने (सीकेवायसीआर) नवी व्यवस्था उभी केली आहे.
एखाद्या व्यक्तीचे केवायसी दस्तावेज गोपनीय ठेवण्यासाठी २ पद्धतींचा वापर केला जाणार आहे. पहिल्या पद्धतीत पॅन, आधार, मतदान कार्ड आणि वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी दस्तावेजांची गोपनीयता राखली जाईल, तर दुसऱ्या पद्धतीत युनिक आयपी अॅड्रेस गोपनीय ठेवला जाईल.
मध्यस्थालाही पाहण्यास मज्जाव
कोणताही दस्तावेज मध्यस्थास पाहता येणार नाही, अशी व्यवस्था यात आहे. ही व्यवस्था १६ डिसेंबर २०२४ पासूनच अमलात येणार होती. बँका व वित्तीय संस्था यासारख्या नियमबंधित संस्थांनी (आरई) मुदतवाढीची मागणी केल्यानंतर २० जानेवारी २०२५ पासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गैरप्रकार नेमके कसे रोखले जाणार?
यात आधार, पॅन, मतदान ओळखपत्र आणि वाहन चालविण्याचा परवाना यांसारख्या दस्तावेजांच्या क्रमांकाचे केवळ शेवटचे ४ अंकच संबंधित संस्था पाहू शकेल. बाकीचे अंक झाकलेले असतील.
ज्यांना केवायसीचा संपर्क आहे, त्यांना हे दस्तावेज डाउनलोड करता येणार नाहीत, त्यांना यावरील पूर्ण क्रमांकही दिसणार नाही.
केवायसी दस्तावेज केवळ संबंधित वित्तीय संस्थेलाच उपलब्ध होतील. अनेक संस्था केवायसीची कामे तृतीय पक्षाकडे सोपवतात. हे आता चालणार नाही प्रत्येक केवायसी परिचयकर्त्यास स्वतंत्र सीकेवायसी आयडी प्रदान केला जाईल.