ladki bahin yojana : राज्यात विधानसभा निवडणुका २०२४ साठी बिगुल वाजले आहे. दरम्यान, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने महिलांना मोठी भेट दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने ऑक्टोबर महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) पात्र महिलांना ३००० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
निवडणूक आयोगाची निधीवर बंदी
आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील मतदारांना कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ थेट न देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर राज्याच्या महिला आणि कल्याण मंत्रालयाने लाडकी बहीण योजनेसाठी दिलेला निधी थांबवला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २.४ कोटी महिलांच्या खात्यात ५ हप्ते पाठवण्यात आले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काळात महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. याशिवाय या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकारणेही बंद करण्यात आले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते आधीच जारी केले आहेत.
दिवाळी बोनस मिळणार का?
दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेंतर्गत ३००० रुपयांचा बोनस जाहीर केला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर बोनसचे पैसे मिळणे कठीण दिसत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असे सरकारने सांगितले होते. याशिवाय काही निवडक मुली आणि महिलांना २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाणार होती. मात्र, आता हे पैसे मिळणे सध्या तरी शक्य दिसत नाही.
लाडकी बहीण योदना बंद करणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाने तात्पुरती यावर बंदी घातली आहे. मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आम्ही आधीच लाडकी बहिणींना पाठवल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही योजना आम्ही सत्तेत आल्यानंतर चालूच ठेवणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.