नागपूर : लाखोळीची लागवड, साठा आणि विक्रीवरील बंदी केंद्र सरकारने २९ डिसेंबर २०१५ ला हटविल्याचे परिणाम आता धान्य बाजारात दिसून येत आहे. तहसील आणि ग्रामीण भागात लाखोळी डाळीची विक्री वाढल्यामुळे तूर डाळीच्या किमतीत प्रति किलो ५० रुपयांची घट झाली आहे. त्या तुलनेत लाखोळी डाळीचे भाव वर्षभरात प्रति किलो २५ वरून ५० रुपयांवर गेले आहेत.
इतवारी ठोक बाजाराचा आढावा घेतला असता उत्तम प्रतिच्या तूर डाळीचे प्रति क्विंटल दर १२,००० ते १२,४०० रुपये, मध्यम ११,५०० ते ११,६००, फोड दर्जाची डाळ १०,३०० ते ११,३०० रुपये आहे. किरकोळ बाजारात उत्तम दर्जाची तूर डाळ प्रति किलो १४० रुपये आहे. अर्थात गेल्या तीन ते चार महिन्यांत डाळीच्या किमतीत तब्बल ५० रुपयांची घट झाल्याची माहिती नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कळमना बाजारात विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटक येथून तुरीची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. विदर्भातील नवीन गावरानी तुरीचे भाव प्रति क्विंटल ७६०० ते ७७०० रुपये आणि विदेशी आयातीत तूर ७२०० रुपये विकल्या गेली. यंदा तुरीच्या उत्पादनात घट झाली आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी देशात १७३.३ लाख टन डाळींचे उत्पादन होण्याची शक्यता असून तुलनेत २३० ते २३५ लाख टन उत्पादनांची गरज आहे.