नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात जोरदार विक्रीची संधी साधण्यासाठी देशातील ई-कॉमर्स कंपन्या सरसावल्या आहेत. कंपन्यांकडून सणासुदीच्या ऑफर्सची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होत आहे. मार्केट रिसर्च क्षेत्रातील फर्म डेटाम इंटेलिजन्सच्या अहवालानुसार या सणासुदीच्या हंगामात ऑनलाइन विक्री १०० कोटींच्या घरात पोहचण्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षीपेक्षा ही उलाढाल २३ टक्के वाढणार आहे. मागील वर्षी ८१ कोटींची विक्री झाली होती.
ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, मिंत्रासह क्लिअरट्रीप आदी कंपन्यांनी आपला उत्पादनसाठा वाढविण्यासोबत कामगारांची भरती, पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला आहे. उत्पादनांचा पुरवठा ग्राहकांना तत्काळ केला जावा यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने यंत्रणा उभारल्या जात आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत विक्री वाढवण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असणार आहे.
एक लाखहून अधिक नोकऱ्या
फ्लिपकार्टकडून सीझनसाठी ११ फुलफिलमेंट सेंटर्स उभी केली जाणार आहेत. ४० हून अधिक विभागात १ लाखहून अधिक नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. या नोकऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतील.
उत्पादने ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचावी यासाठी नव्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुरवठा साखळी आणखी मजबूत जाईल. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेत १९००० पिनकोडवर वेगाने डिलिव्हरी पोहोचवण्याची यंत्रणा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. बहुतांश शहरांमध्ये ऑर्डर केल्याच्या दिवशीच तसेच दुसऱ्या दिवशी उत्पादने पोहोचावी असा प्रयत्न असणार आहे.
हॉलिडे पॅकेजेस आणि विशेष सूट : क्लिअरट्रीपने सणासुदीसाठी सेलची घोषणा केली आहे. यासाठी विविध शहरांमधील हॉटेलांशी संपर्क साधण्यात आला आहे. ट्रॅव्हल कंपन्यांकडून हॉटेल बुकिंग, विमानांची तिकिटे, बसभाडे आदींसाठी हॉलिडे पॅकेजेस देण्यात येत आहेत.
महिलांसह सेवेत घेतले १,९०० दिव्यांगांना
अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष अभिनव सिंह म्हणाले की, वस्तूंची डिलिव्हरी तत्काळ करता यावी यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यात काही रोजगार प्रत्यक्ष तर काही अप्रत्यक्ष आहेत.
मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये ॲमेझॉनने हजारो महिला कर्मचाऱ्यांसह १९०० दिव्यांगांनाही सेवेत सामावून घेतले आहे.
उत्पादनांचा वाटा किती?
क्विक कॉमर्स विक्री ८.५ कोटींच्या घरात जाऊ शकते. किराणा माल, सौंदर्य प्रसाधने, पर्सनल केअर उत्पादनांची विक्री ५१ टक्के वाढू शकते. मागील वर्षी ही विक्री ३७.६ टक्के वाढली होती.
लॅपटॉप, मोबाइल, फॅशनवेअर यांना मागणी असेल. मोबाइलच्या विक्रीची वाटा २९.९ टक्के तर फॅशनवेअरचा वाटा १९.६ टक्के इतका असू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीचा हिस्सा १७.५ टक्के इतका असण्याची शक्यता आहे.