Join us

लक्ष्मी मित्तल यांचे बंधू प्रमोद ठरले दिवाळखोर, मुलीच्या लग्नावर केला होता ४८५ कोटी रुपयांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 9:33 AM

ब्रिटनच्या दिवाळखोरीविषयक खटले चालविणाऱ्या न्यायालयाने ६४ वर्षे वयाच्या प्रमोद मित्तल यांना दिवाळखोर घोषित केले आहे.

लंडन : ब्रिटनमधील १९व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती व स्टीलकिंग लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल हे त्या देशातील सर्वात मोठे दिवाळखोर व्यक्ती ठरले आहेत. आपल्या मुलीच्या लग्नावर सुमारे ४८५ कोटी रुपये खर्च करणाऱ्या प्रमोद मित्तल यांच्यावर आता ही बिकट स्थिती ओढवली आहे.

ब्रिटनच्या दिवाळखोरीविषयक खटले चालविणाऱ्या न्यायालयाने ६४ वर्षे वयाच्या प्रमोद मित्तल यांना दिवाळखोर घोषित केले आहे. त्यांच्यावर सध्या २५४ कोटी पौंडचे कर्ज आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या ९४ वर्षीय वडिलांकडून घेतलेल्या १७ कोटी पौंड कर्जाचाही समावेश आहे. आपल्याला सध्या कोणत्याही प्र्रकारचे उत्पन्न नाही, असा दावा त्यांनी न्यायालयासमोर केला होता.

प्रमोद मित्तल यांच्याकडे सध्या सात हजार पौंड किमतीचे दागदागिने, ६६,६६९ पौंड किमतीचे शेअर इतकीच गुंतवणूक आहे. त्यांनी आपली पत्नी संगीताकडून ११ लाख पौंड, ३० वर्षे वयाचा पुत्र दिव्येशकडून २४ लाख पौंड, मेव्हणा अमित लोहिया याच्याकडून ११ लाख पौंड कर्ज घेतले असल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

प्रमोद मित्तल हे अफाट खर्च करण्यासाठी प्रसिद्ध होते. २०१३ साली आपली मुलगी सृष्टीच्या विवाहावर ४५० कोटी रुपये खर्च केले होते. लक्ष्मी मित्तल यांनी आपली मुलगी वनिषा हिच्या लग्नासाठी २००४ साली जितका खर्च केला होता त्यापेक्षा प्रमोद यांनी आपल्या मुलीच्या विवाहावर १ कोटी पौंड अधिक खर्च केला होता.आपल्या भावाला दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी लक्ष्मी मित्तल यांनी आता कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.

या कारणामुळे आली विपन्नावस्थाबोस्नियातील ग्लोबल इस्पात कोकस्ना इंडस्ट्रीज (गिकिल) या कंपनीचे प्रमोद मित्तल सहमालक होते. त्यांनी या कंपनीने घेतलेल्या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली होती. सुमारे १६.६ कोटी डॉलरचे घेतलेले कर्ज फेडण्यास गिकिल अपयशी ठरल्यामुळे प्रमोद मित्तल यांचे वाईट दिवस सुरू झाले. 

टॅग्स :लंडनव्यवसायइंग्लंड