सध्या देशात टाटा, मित्तल, अग्रवाल हे खूप मागे पडले आहेत. तर अंबानी आणि अदानींमध्येच पुढे कोण याची स्पर्धा लागली आहे. अशातच एनर्जी सेक्टरही ताब्यात घेण्यासाठी हे दोन्ही ग्रुप जोरदार प्रयत्न करत आहेत. कोणाला ग्रीन एनर्जीमध्ये पुढे जायचेय तर कोणाला पारंपरिक एनर्जीमध्ये. अशातच एकाच कंपनीसाठी दोन्ही ग्रुपची टक्कर होणार होता. ती आता होता होता राहिली आहे.
गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हे थर्मल पावर कंपनी लैंको अमरकंटक (Lanco Amarkantak Power) विकत घेण्यासाठी समोरासमोर ठाकले होते. मात्र, असे काही घडले की दोघांनीही तलवारी म्यान करून माघार घेतली आहे. कंपनीच्या विक्री प्रकियेत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत दोन्ही कंपन्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. अदानी ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीने तिसऱ्या राऊंडमधील बोलीमध्ये भागच घेतला नाही.
बिझनेस-स्टँडर्डमधील वृत्तानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजने लॅन्को अमरकंटक पॉवर खरेदी करण्यासाठी 1,960 कोटी रुपयांची रोख रक्कम देऊ केली होती. तर अदानी ग्रुपची कंपनी असलेल्या अदानी पॉवरने लॅन्को अमरकंटक पॉवर खरेदी करण्यासाठी 1,800 कोटी रुपयांची बोली लावली होती. जास्त रक्कम असल्याने अंबानींनाच ही कंपनी मिळेल असे वाटत होते.
अमरकंटक पॉवर हा कोळशावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प आहे. कंपनीवर मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे, त्यामुळे ती विकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीवर 17 बँकांचे एकूण 14,632 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कोरबा-चंपा राज्य महामार्गावरील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची मालकी या कंपनीकडे आहे. अमरकंटक विकत घेण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला होता. वेदांताने ३००० कोटींची ऑफर दिली होती. जिंदाल पॉवर लिमिटेड, ट्विन स्टार टेक्नॉलॉजीज, ओकट्री कॅपिटल आणि पीएफसी यांनीही कंपनी खरेदी करण्यात स्वारस्य दाखविले आहे.