Join us

सोन्याचा देशातील सर्वांत मोठा साठा बिहारच्या जमुईमध्ये, देशात ५०.१८३ कोटी टन सोने खनिज, प्रल्हाद जोशी यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 09:23 IST

Gold News: सोन्याच्या खनिजांचा देशातील सर्वाधिक साठा बिहारात असल्याची माहिती केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत दिली. बिहारात एकूण २२३ दशलक्ष टन सुवर्ण खनिज असून त्यात ३७.६ टन सोने धातू आहे.

पाटणा : सोन्याच्या खनिजांचा देशातील सर्वाधिक साठा बिहारात असल्याची माहिती केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत दिली. बिहारात एकूण २२३ दशलक्ष टन सुवर्ण खनिज असून त्यात ३७.६ टन सोने धातू आहे. विशेष म्हणजे हा सर्व सुवर्णसाठा बिहारच्या जमुई येथील सोनो क्षेत्रात आहे, असे जोशी यांनी सांगितले.

डॉ. संजय जायस्वाल यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात जोशी यांनी लोकसभेत सांगितले की, १ एप्रिल २०१५ पर्यंत देशात ५०१.८३ दशलक्ष टन सुवर्ण खनिज असल्याचे अनुमान आहे. यात ६५४.७४ टन सोने धातू आहे. यातील ४४ टक्के सोने एकट्या बिहारमध्ये आहे. जोशी यांनी सांगितले की, बिहारातील सोन्याच्या खनिजांना संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेम वर्गीकरण कोड- ३३३ (२१.६ टन धातुयुक्त १२८.८८ दशलक्ष टन खनिज ) आणि कोड- ३३४ (१६ टन धातुयुक्त ९४ दशलक्ष टन खनिज) अनुसार श्रेणीबद्ध करण्यात आले आहे. मागील ५ वर्षांत भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने पश्चिम चंपारण आणि गया जिल्ह्यांत प्रारंभिक सर्वेक्षण केले. मात्र येथे सोन्याची सरासरी उपलब्धता कमी असल्याचे आढळून आले.

जोशी यांनी सांगितले की, राष्ट्रीय खनिज साठ्याशी संबंधित डाटानुसार, १ एप्रिल २०१५ पर्यंत देशात ५०.१८३  कोटी टन सोने खनिज आहे. यातील १.७२२ कोटी टन साठा सुरक्षित श्रेणीतील, तर उरलेला संसाधन श्रेणीतील आहे.

टॅग्स :सोनंबिहार