Join us

ग्रीसला युरोझोनकडून अखेरची संधी

By admin | Published: July 07, 2015 10:48 PM

ग्रीसच्या आर्थिक समस्येवर युरोझोनमधील नेत्यांची तातडीची बैठक ब्रुसेल्स येथे होणार आहे.

ब्रुसेल्स : ग्रीसच्या आर्थिक समस्येवर युरोझोनमधील नेत्यांची तातडीची बैठक ब्रुसेल्स येथे होणार असून, ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस सिपारीस यांना या बैठकीत आर्थिक सुधारणांचा नवा विश्वासार्ह प्रस्ताव मांडावा लागणार आहे. हा प्रस्ताव मंजूर होतो का, युरोपीय नेते ग्रीसच्या प्रश्नावर कसा विचार करतात यावर ग्रीसचे अस्तित्व अवलंबून आहे. कारण ग्रीसच्या बँकांतील पैसा संपत आला असून, त्याआधी हा निर्णय होणे गरजेचे आहे. ग्रीसला मदत देणाऱ्या देशांनी गेल्या काही दिवसांत मदत रोखली आहे. युरोपियन सेंट्रल बँक (ईसीबी)ने कर्ज देण्यावर निर्बंध आणले असून सिपारीस यांना युरोझोनमधील १८ नेत्यांना आपली भूमिका पटवून द्यावी लागणार आहे. गेली पाच वर्षे ग्रीसमधील आर्थिक संकट पाहणाऱ्या नेत्यांना आता बस्स झाले, असे वाटत असून, त्यांना वाटाघाटींचे अधिकार देत सिपारीस यांना नवे कर्ज मंजूर करून घ्यावे लागणार आहे. युरोपियन देशात जर्मनी व फ्रान्स हे दोन देश ग्रीसला मदत करण्यात आघाडीवर आहेत. ग्रीसला आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी करार करण्यासाठी अद्याप दारे उघडी आहेत, असा संदेश या दोन नेत्यांनी दिला आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यावर ग्रीसला खुले सोडून देण्यासाठी दबाव येत आहे. सिपारस पटेल असा प्रस्ताव घेऊन आले, त्यांनी ग्रीसमध्ये कर वाढविण्यास, निवृत्ती वेतनात काटछाट करण्यास तसेच कामगार सुधारणा करण्यास मान्यता दिली, तर मदत करता येईल, असे मर्केल यांनी म्हटले आहे. युरोपियन आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर यांनी युरोपियन संसदेत असे सांगितले आहे की, युरोपियन युनियनमध्ये काही नेते खुलेपणाने वा गुप्तपणे ग्रीसला युरोझोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.ग्रीसने विनंती केल्यास मदत -आयएमएफ वॉशिंग्टन : आर्थिक डबघाईला आलेल्या ग्रीसने मदतीची विनंती केल्यास बेलआऊट पॅकेज नाकारल्यानंतरही ग्रीसला मदत करता येईल, असे जागतिक नाणेनिधीच्या अध्यक्षा क्रिस्टिन लेगार्ड यांनी म्हटले आहे. लेगार्ड यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात ग्रीस व युरोपियन युनियन यांच्यातील घटनांवर आपण बारीक लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.