नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या मुहर्तावर नोकरी करणाऱ्या लोकांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. प्रोव्हिडंट फंडावर मिळणारे 8.5 टक्के व्याज एका टप्प्यात जमा करण्यावर अर्थमंत्रालयाने मोहर लावली आहे. यामुळे कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेला (EPFO) आता खातेधारकांच्या खात्यात एकाच टप्प्यात पैसे ट्रान्सफर करण्याची मंजुरी मिळाली आहे.
आर्थिक वर्ष 2019-20साठी प्रोव्हिडंट फंडातील रकमेवर 8.5% दराने व्याज जमा करण्यासंदर्भात नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे. यानुसार, आता जेवढे PF शेअर होल्डर आहेत त्यांच्या खात्यात आजपासून 8.5% व्याजदराने पैसे जामा होणे सुरू होईल. केंद्रिय मंत्री संतोष गंगवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे, खातेधारकांच्या खात्यात आता एकाच वेळी व्याज जमा होऊ शकेल. यापूर्वी ईपीएफओकडून 8.5 टक्के व्याज दोन टप्प्यात जमा केले जात होते. यात, एका वेळी 8.15 टक्के रक्कम जमा केली जात होती. तर दुसऱ्या वेळी 0.35 टक्के रक्कम खात्यात जमा केली जात होती.
6 कोटी खातेधारकांना होणार फायदा -
अर्थमंत्रालयाच्या या निर्णयामुळे ईपीएफओमध्ये रजिस्टर्ड असलेल्या 6 कोटी खातेधारकांना याचा फायदा होणार आहे. बिझनेस लाईनने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार लवकरच खादेधारकांच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करणार आहे.
आता एकाच वेळी मिळणार व्याज -
अर्थमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर, आता कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेकडून लवकरच आर्थिक वर्ष 2019-20 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात 8.50 टक्के व्याज जमा करेल. यापूर्वी ईपीएफओने आर्थिक वर्ष 2019मध्ये 8.65 व्याज दिले होते. वित्त वर्ष 2020 मध्ये ईपीएफवर 8.5 टक्के व्याज देण्यात आले आहे. हे व्याज गत 7 वर्षांचा विचार करता सर्वात कमी आहे. एकाच टप्प्यात व्याजाची रक्कम खात्यात ट्रान्सफर झाल्यास खातेधारकांना फायदा होईल, तसेच ईपीएफओचा त्रासही कमी होईल, असे मानले जात आहे. आपण आपल्या पीएफ खात्यातील बॅलेन्स ऑनलाईन अथवा मिस्ड कॉल देऊन जाणून घेऊ शकता.