Nita Mukesh Ambani Cultural Centre : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटन शुक्रवारी देश-विदेशी कलाकार, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलं. “सांस्कृतिक केंद्राला मिळत असलेला पाठींबा पाहून मी भारावून गेले आहे. हे जगातील सर्वात चांगल्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. मी या ठिकाणी सर्व कला आणि कलाकारांचं स्वागत करते. या ठिकाणी छोट्या शहरातून आणि दूरवरील भागातून आलेल्या कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी मिळेल. जगातील सर्वोत्कृष्ट कला या ठिकाणी सादर केल्या जातील अशी मला अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी (Nita Ambani) यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमाला नीता अंबानी यांच्यासह इशा अंबानी आणि मुकेश अंबानी हेदेखील उपस्थित होते. “मुंबईबरोबरच हे देशासाठीही एक मोठे कलाकेंद्र म्हणून उदयास येणार आहे. मोठे शो येथे आयोजित केले जाऊ शकतात. मला आशा आहे भारतीय आपल्या कलात्मकतेनं नवे शो सादर करू शकतील,” असे मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. याशिवाय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, लॉन टेनिसपटू सानिया मिर्झा आणि अॅथलीट दीपा मलिक हेदेखील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.
बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लाँचदरम्यान बॉलिवूड आणि दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. सुपरस्टार रजनीकांत, आमिर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, वरुण धवन, सोनम कपूर, अनुपम खेर, जावेद अख्तर, शबाना आझमी, सुनील शेट्टी आणि शाहिद कपूर येथे उपस्थित होते. याशिवाय या ठिकाणीआंतरराष्ट्रीय कलाकारांनीदेखील उपस्थिती लावली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणीदेखील कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होत्या.