Laxman Kirloskar Success Story : देशात यशस्वी उद्योजक म्हटलं की अदानी, अंबानी आणि टाटांसारख्या लोकांची नावे आपसुक ओठांवर येतात. या लोकांनी फक्त उद्योगच नाही तर देशउभारणीतही मोठा वाटा उचलला आहे. देशात रोजगार निर्मितीपासून औद्योगिक प्रगतीत यांचे भरीव योगदान आहे. या नावांमध्ये एक मराठमोळं नावंही हिऱ्याप्रमाणे चकाकतं. व्यवसायने शिक्षक असलेल्या या व्यक्तीने सायकलच्या दुकानापासून कोट्यवधी रुपयांचा उद्योग उभारला आहे. राजर्षि शाहू महाराज यांनी मराठेशाहीच्या तोफा या व्यक्तीच्या ताब्यात दिल्या होत्या. आपण बोलतोय लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर यांच्याबद्दल.
सायकलच्या दुकानापासून उद्योगाला सुरुवात
देशातील प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर यांनी सायकलच्या दुकानापासून हजारो कोटींच्या व्यवसायापर्यंतचा प्रवास केला. सायकलचे दुकान उघडून त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याआधी ते ४५ रुपयांच्या पगारावर शिक्षकाची नोकरी करत होते. २० जून १८६९ रोजी म्हैसूरमधील बेळगावी येथील गुरलाहोसूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर यांनी 'किर्लोस्कर उद्योग समूहा'चा पाया घातला होता.
लहानपणी अभ्यासात रमत नव्हते मन
लक्ष्मण यांचे वडील काशिनाथ पंत हे वेदांत-पंडित होते. मुलगाही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून असेच काम करेल, अशी अपेक्षा त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. पण किर्लोस्करांनी स्वतःचं नशीब स्वतःच लिहायचं ठरवलं होतं. त्यांनी परंपरांपासून दूर राहून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम केले. मात्र, लहानपणी त्यांचं अभ्यासात मन रमत नव्हते. पण, नंतर त्यांनी मॅकनिकल विषयात पदवी घेतली. पुढे मुंबईतील 'व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट' या संस्थेत शिक्षक म्हणून नियुक्त झाले. फावल्या वेळात ते कारखान्यात काम करत असे. इथून त्यांची यंत्रांबद्दलची आवड वाढली.
'किर्लोस्कर ब्रदर्स' नावाने उघडलं दुकान
लक्ष्मण किर्लोस्कर यांनी पहिल्यांदा एका व्यक्तीला सायकल चालवताना पाहिले. तेव्हा त्यांनी आपल्या भावासोबत 'किर्लोस्कर ब्रदर्स' नावाचे सायकलचे दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. सायकल विकण्यासोबतच त्यांनी लोकांना सायकल कशी चालवायची हे देखील शिकवले. याशिवाय शाळेतही ते अध्यापनाचे काम करतच होते. मात्र, एका अँग्लो-इंडियन शिक्षकाला त्यांच्या जागेवर बढती दिल्याने त्यांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी एक कारखाना काढला. या कारखान्यात चारा कापण्याचे यंत्र आणि लोखंडी नांगर निर्मिती सुरू केली. मात्र, कारखान्याच्या कामात अडथळा येत असल्याने त्यांना आपला कारखाना महाराष्ट्रात आणावा लागला. येथे त्यांनी 32 एकर जागेवर 'किर्लोस्कर वाडी' नावाच्या औद्योगिक वसाहतीचा पाया घातला.
राजर्षि शाहू महाराजांनी दिल्या होत्या तोफा
किर्लोस्करांनी अनेक औद्योगिक युनिटला इथूनच सुरुवात केली. शेती आणि उद्योगात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांची निर्मिती यामध्ये होऊ लागली. किर्लोस्कर यांच्या कार्याची लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांसारख्या महान व्यक्तींनी कौतुक केलं होतं. एकवेळ अशी आली होती की त्यांना नांगर तयार करण्यासाठी लोखंड अपुरं पडत होतं. त्यावेळी राजर्षि शाहू महाराज यांनी आपल्या तोफखान्यातील तोफा किर्लोस्करांना दिल्या होत्या. उद्योगपती लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर यांचे २६ सप्टेंबर १९५६ रोजी निधन झाले. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर कंपनीने आणखी प्रगती केली. आज या कंपनीचा व्यवसाय जगभर पसरलेला आहे आणि तिचे उत्पन्न अब्जावधींच्या घरात आहे.