Join us

HDFC Bank वर म्युच्युअल फंडांचा भरवसा नाय काय? ऑगस्टमध्ये विकले ₹८,२०० कोटींचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 3:36 PM

बहुतांश म्युच्युअल फंड हाऊसेसची एचडीएफसी बँक ही गुंतवणूकीसाठीची आवडती बँक आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात काहीसं वेगळं चित्र निर्माण झालं आहे.

बहुतांश म्युच्युअल फंड हाऊसेसची एचडीएफसी बँक ही गुंतवणूकीसाठीची आवडती बँक आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात काहीसं वेगळं चित्र निर्माण झालं आहे. आघाडीच्या म्युच्युअल फंड हाऊसेसनं ऑगस्टमध्ये एचडीएफसी बँकेचे ८,२०० कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स विकले असल्याची माहिती समोर आलीये. ४१ फंडांपैकी २३ फंडांनी आपला हिस्सा कमी केला आहे. 

शेअर सेलर्समध्ये कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड, क्वांट म्युच्युअल फंड आणि एसबीआय म्युच्युअल फंड प्रमुख आहेत. म्युच्युअल फंडांनी ऑगस्टमध्ये सुमारे ५.०६ कोटी शेअर्सची विक्री केली. सलग सात महिन्यांच्या खरेदीनंतर एचडीएफसी बँकेत या फंडांची विक्री झाली आहे. जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत म्युच्युअल फंडांनी एचडीएफसी बँकेत ४५,००० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडानं ऑगस्टमध्ये एचडीएफसी बँकेतील ४,१८८ कोटी रुपयांचे २.५६ कोटी शेअर्स विकले. क्वांट म्युच्युअल फंडानं आपला संपूर्ण हिस्सा म्हणजेच २,८२७ कोटी रुपयांचे १.७३ कोटी शेअर्स विकले. एसबीआय म्युच्युअल फंडाने १,११० कोटी रुपयांचे ६८ लाख शेअर्स विकले. तर आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडानं ७१८ कोटी, इन्वेस्को म्युच्युअल फंडानं ६०४ कोटी, अॅक्सिस म्युच्युअल फंडाने २५० कोटींची विक्री आणि टाटा म्युच्युअल फंडानं २३३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

काही फंड हाऊसेसस आताही बुलिश

विक्री झाली असली तरी एचडीएफसी बँकेच्या शेअरवर अजूनही काही फंड हाऊसेस बुलिश दिसून येत आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड एचडीएफसी बँकेच्या शेअरची सर्वाधिक खरेदीदार ठरला. फंड हाऊसनं १,९७४ कोटी रुपयांचे १.१९ कोटी शेअर्स खरेदी केले. त्या खालोखाल यूटीआय म्युच्युअल फंडानं २५१ कोटी रुपये आणि निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने २३८ कोटी रुपयांची खरेदी केली.

ऑगस्टमध्ये ४१ म्युच्युअल फंडांकडे एचडीएफसी बँकेचे २.५१ लाख कोटी रुपयांचे १५३.८७ कोटी शेअर्स होते. तर जुलैमध्ये फंड हाऊसेसकडे २.५९ लाख कोटी रुपयांचे शेअर्स होते.

शेअरची खराब कामगिरी

काही म्युच्युअल फंड हाऊसेसनं बँकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री करण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. एचडीएफसी बँकेचा शेअर २०२४ च्या सुरुवातीपासून खराब कामगिरी करत आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत त्यात २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया २३ टक्के, आयसीआयसीआय बँक २४ टक्के, अॅक्सिस बँक १० टक्क्यांनी वधारले.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एचडीएफसीगुंतवणूकएसबीआय