बंगळुरू : नोकरीचा पाच ते दहा वर्षांचा अनुभव असलेले आयटी व्यावसायिक स्वखर्चाने विविध अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:ला अद्ययावत करून घेत आहेत. सुमारे चार लाख रुपयांपर्यंतचा खर्च त्यासाठी ते करीत असून, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना वेतनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ मिळत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:ला अद्ययावत करून घेण्याचा हा कल आयटी उद्योगात अलीकडे दिसून येत आहे.
सूत्रांनी सांगितले की, हे अभ्यासक्रम साधारणत: दहा ते बारा महिन्यांचे असतात. आॅनलाइन व्हिडिओ क्लासेस, असाइनमेंट्स आणि चाचण्या असे त्यांचे स्वरूप असते. आयटी उद्योगातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी सॉफ्टवेअर प्रोगामर या पदावरून डाटा सायंटिस्ट या पदावर पदोन्नत होतात. त्यांच्या वेतनातही ४० टक्क्यांपर्यंत वाढ होते.
हेड हंटर्स इंडिया या संस्थेचे संस्थापक क्रिस लक्ष्मीकांत यांनी सांगितले की, बहुतांश आयटी कंपन्या आपल्या कर्मचाºयांचे पुनर्प्रशिक्षण करीत नाहीत. एक तर कंपन्यांकडे अशा प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली सुविधा नाही. तसेच कंपन्यांना एवढा वेळही नसतो. त्यामुळे मधल्या फळीत काम करणारे अनेक जण अशा प्रकारचे आॅनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:ला अद्ययावत करून घेतात. आहे ती नोकरी टिकविण्यासाठी अथवा अधिक चांगले पद मिळण्यासाठी या अभ्यासक्रमांचा उपयोग होतो.
आॅनलाइन प्रशिक्षण देणाºया अपग्रेड या संस्थेचे संस्थापक मयंक कुमार यांनी सांगितले की, अनेक आयटी व्यावसायिक तर अशा अभ्यासक्रमांसाठी कर्ज घेतात. इंडिया स्कूल आॅफ बिझनेस अथवा अन्य एमबीए कॉलेजमधील एक वर्षाची फी ६ लाखांच्या पुढे असते. त्या तुलनेत आयटीच्या पुनर्प्रशिक्षण अभ्यासक्रमांची फी फारच कमी आहे. स्वत:च्या शिक्षणावर अशा प्रकारे खर्च करण्याची आपल्याला सवय नाही. मात्र, आता ही काळाची गरज बनली आहे.
कारण नव्या तंत्रज्ञानामुळे आधीचे तंत्रज्ञान कालबाह्य ठरत आहे. नवीन तंत्रज्ञान शिकला नाहीत, तर तुम्ही नोकरीत टिकून राहू शकत नाही. डाटा अॅनॅलिटिक्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्लाऊट आणि इंटरनेट आॅफ थिंग्ज या क्षेत्रातच आता चांगल्या नोकºया आहेत. ही सर्वच क्षेत्रे नवी आहेत. (वृत्तसंस्था)
अभ्यासक्रमाचा झाला फायदा
२०१० मध्ये इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करणाºया २९ वर्षीय विजयकीर्ती याने टीसीएसच्या चेन्नई कार्यालयात दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर त्याने २०१४-१५ मध्ये ग्रेट लेक्स संस्थेत बिझनेस अॅनॅलिटिक्सचा अभ्यासक्रम केला.
त्याने सांगितले की, मला अभ्यासक्रमासाठी ४.५ लाखांचा खर्च आला. मात्र, त्याचा मला फायदा झाला. आता मी बंगळुरूत कॉग्निझंटमध्ये डाटा सायंटिस्ट म्हणून काम करीत आहे. माझा पगारही वाढला आहे.
आयटी व्यावसायिकांचा नवीन तंत्रज्ञानाकडे ओढा
नोकरीचा पाच ते दहा वर्षांचा अनुभव असलेले आयटी व्यावसायिक स्वखर्चाने विविध अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:ला अद्ययावत करून घेत आहेत. सुमारे चार लाख रुपयांपर्यंतचा खर्च त्यासाठी ते करीत असून, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना वेतनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ मिळत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:11 AM2017-08-09T01:11:11+5:302017-08-09T01:11:19+5:30