Join us

टर्म इन्शुरन्स फायद्याचा की तोट्याचा? घ्यावा की नको?; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 10:33 AM

फायनान्शिअल विस्डममधील पुढील महत्त्वाचा घटक आहे टर्म इन्शुरन्स.

पुष्कर कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क 

फायनान्शिअल विस्डममधील पुढील महत्त्वाचा घटक आहे टर्म इन्शुरन्स. मराठीत याला मुदत विमा म्हणतात. मग हा इन्शुरन्स प्लॅन घ्यावा की  नको? जाणून घेऊया... हा विमा काय असतो आणि तो तोट्याचा असतो की फायद्याचा...

टर्म इन्शुरन्स म्हणजे नेमके काय?

विशिष्ट मुदतीसाठी (एक वर्ष ) ठराविक रकमेचा विमा म्हणजे टर्म इन्शुरन्स. हा इन्शुरन्स प्लॅन विविध इन्शुरन्स कंपन्या देऊ करतात. उदा. २५ वर्षांचा टर्म निवडला तर हा विमा प्रत्येक वर्षी ठराविक प्रीमियम भरून पुढे सुरु ठेवावा लागतो.

कोणी घ्यावा टर्म इन्शुरन्स? 

घरातील कर्ती व्यक्ती जिच्यावर घर आणि घरातील इतर सदस्य आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत, अशा व्यक्तीने टर्म इन्शुरन्स घेणे अत्यंत आवश्यक आहे.

का घ्यावा टर्म इन्शुरन्स? 

विपरीत परिस्थितीत न जाणो कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशा व्यक्तीच्या वारासदारास विमा रक्कम मिळते आणि पुढील आर्थिक ताणतणावातून बऱ्याच अंशी मुक्तता होते.

किती रकमेचा घ्यावा? 

उत्पन्नाच्या (टॅक्स रिटर्न्स) आधारावर जास्तीतजास्त  विमा रक्कम ठरविली जाते. ही रक्कम किती असावी याकरिता आपल्यावरील कर्जे, अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या व आपल्या पश्चात त्यांना भविष्यात विविध कारणांसाठी लागणाऱ्या रकमेचा अंदाज घेऊन पॉलिसीची रक्कम ठरवावी. उदा. पत्नी मिळविती नसल्यास पुढील उदर्निवाह, मुलांचे शिक्षण बाकी असल्यास त्यास लागणार खर्च इत्यादी.

टर्म इन्शुरन्सचा कालावधी किती  असावा?

व्यक्तिगत जबाबदाऱ्यांमधून ज्या वयात मुक्त होऊ त्या वयापर्यंत असावा. किमान साठीपर्यंत.

- टर्म इन्शुरन्सचे प्रत्येक वर्षी पॉलिसी मुदत संपण्यापूर्वीच नूतनीकरण करणे आवश्यक असते. अन्यथा पॉलिसी रद्द होते. 

- विमा रक्कम दरवर्षी भरावी लागते आणि भरलेली रक्कम इतर विमा पॉलिसी प्रमाणे परत मिळत नाही या विचाराने अनेक जण टर्म इन्शुरन्स घेणे टाळात असतात. आपल्या आर्थिक सुनिश्चिततेसाठी मुदत विमा घेणे अत्यंत आवश्यक आहे.