Join us

Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 2:29 PM

Noel Tata News: दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांचे सावत्र बंधू नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे (Tata Trust) नवे अध्यक्ष असतील. या नियुक्तीनंतर नोएल नवल टाटा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Noel Tata News: दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांचे सावत्र बंधू नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे (Tata Trust) नवे अध्यक्ष असतील. संचालक मंडळाच्या बैठकीत नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीनंतर नोएल नवल टाटा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

"माझ्या सहविश्वस्तांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, त्याबद्दल मला अतिशय सन्मानित वाटत आहे आणि मी याबद्दल कृतज्ञदेखील आहे. रतन नवल टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिन. टाटा ट्रस्ट हे समाजहिताचे साधन आहे. आम्ही राष्ट्र उभारणीत आपली भूमिका बजावत राहू," असं नोएल टाटा म्हणाले.

रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. त्यानंतरच 'टाटा ट्रस्ट'च्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या उत्तराधिकारी कोण असेल याचा शोध सुरू झाला. उत्तराधिकारी निवडण्यासाठी टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठक झाली आणि त्यात नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

रतन टाटा यांच्याशी नोएल यांचं नातं काय?

नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. वडील नवल टाटा यांनी दोन विवाह केले होते. पहिली पत्नी सुनी यांच्यापासून त्यांना रतन आणि जिम्मी अशी दोन मुले झाली. हे दोघेही अविवाहित राहिले.  सुनी टाटा यांच्याशी घटस्फोटानंतर नवल टाटा यांनी स्विट्जरलँडची बिझनेस वूमन सिमोन यांच्याशी १९५५ मध्ये दुसरा विवाह केला. सिमोन यांच्यापासून त्यांना नोएल हा मुलगा झाला. नोएल यांचा विवाह आलू मिस्त्री यांच्याशी झाला. आलू या सायरस यांची बहीण व पालनजी मिस्त्री यांची कन्या. नोएल यांना लीह, माया, नेवाईल अशी ३ अपत्ये आहेत.

टाटा सन्स समूहाची मूळ कंपनी

नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट (Sir Dorabji Tata Trust) आणि सर रतन टाटा ट्रस्टचे (Ratan Tata Trust) विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये या दोन्ही ट्रस्टचा मिळून ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची मूळ कंपनी आहे. नोएल टाटा यांच्या निवडीचा निर्णय हा समूहासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्यात एविशएश पासून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या पोर्टफोलिओचा समावेश आहे.

कसा होता नोएल टाटांचा प्रवास?

नोएल टाटा गेल्या ४० वर्षांपासून टाटा समूहाचा भाग आहेत. सध्या ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांचे संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. टाटा स्टील अँड टायटन कंपनी लिमिटेडमध्ये ते उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. नोएल टाटा ऑगस्ट २०१० ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रेंटची उलाढाल ५०० मिलियन डॉलर्सवरून वाढून ३ बिलियन डॉलरवर गेली. नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून पदवी घेतली आहे.  

टॅग्स :रतन टाटानोएल टाटाटाटा