ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - टाटा सन्सने माजी चेअरमन सायरस मिस्त्रींना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सायरस मिस्त्री यांनी संवेदनशील आणि गोपनीय कागदपत्रं उघड केल्याच्या आरोपाखाली ही नोटीस पाठवण्यात आली आहे. टाटा सन्सने सायरस मिस्त्रींवर गोपनीयतेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा रतन टाटा यांच्याकडे सगळा कारभार सोपवण्यात आला होता. त्यानंतरपासून सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत.
रतन टाटा यांच्याकडून सायरस मिस्त्री यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आपली प्रतिमा खराब करण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप गेल्या आठवड्यात रतन टाटांकडून करण्यात आला होता. शेवटी सत्य समोर येईल असंही ते बोलले होते. पदावरुन हटवण्यात आलेले सायरस मिस्त्री आणि नस्ली वाडिया यांच्याकडून आपल्यावर आणि ग्रुपवर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आणि दुखी: असल्याचं रतन टाटांनी म्हटलं होतं.
सायरस मिस्त्री यांनी नुकतीच रतन टाटा आणि टाट सन्सविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. सायरस मिस्त्रींनी याचिकेत टाटा समूहावर गैरव्यवस्थापन आणि हंगामी अध्यक्षांच्या विनाकारण मध्यस्थीचा आरोप केला होता.