दिग्गज गुंतवणूकदार आणि अब्जाधीश वॉरेन बफे यांनी तुरुणांना काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. त्यांनी तरुणांना स्पष्ट रूपात लिहिणं आणि बोलणं शिकण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइन वर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी यासंदर्भात काही संदेश दिला आहे. आपलं मूल्य कमीतकमी ५० टक्क्यांनी वाढवण्याचा एक सोपा उपाय म्हणजे तुमच्या कम्युनिकेशन्स स्किल्स अधिक चांगल्या करणं. यात बोलणं आणि लिहिणं या दोन्हींचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.
कॅनडातील एक स्टार्टअप व्हॉईसफ्लोचे सह-संस्थापक मायकल हूड यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांचं स्टार्टअप कोडींगच्या मदतीशिवाय तरूणांना अॅमेझॉन आणि स्मार्ट स्पीकर अॅलेक्सासाठी स्किल्स डिझाईन करणं, ते तयार करणं आणि लाँच करण्याची सुविधा देतं.
काय म्हणालेत बफे?
“जर तुम्ही कम्युनिकेशन करू शकत नाही, तर हे अंधारात एखाद्या मुलीकडे डोळ्यांनी इशारा करण्यासारखं आहे. त्याचा काहीच फायदा नाही. तुमच्याकडे जगभरातील ज्ञान आहे, परंतु जर तुम्ही कम्युनिकेसन करू शकत नसाल तर त्याचा कोणताच फायदा नाही,” असंही बफे व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडेक्सनुसार बफे यांच्याकडे आता जवळपास ९९.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानी आहेत.
९१ वर्षीय वॉरेन बफे हे अमेरिकन कंपनी बार्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. २००६ मध्ये त्यांनी कंपनीतील आपले ८५ टक्के शेअर्स दान करण्याचं आश्वासन दिलं होतं. याचा मोठा भाग बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला जाणार आहे. त्यांच्या हिस्स्यातील ५६ अब्ज डॉलर्सचा हिस्सा हा या संस्थेकडे जाईल.