अहमदाबाद : भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या पूर्वी असलेल्या पातळीवरच आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या आधीच लहान असलेल्या आकांक्षा आता आणखी ठेंगण्या झाल्याचे प्रतिपादन अर्थशास्त्राचे नोबेल विजेते अभिजीत बॅॅनर्जी यांनी व्यक्त केले.
अहमदाबाद विद्यापीठाच्या ११व्या दीक्षांत समारंभामध्ये आभासी पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. आपण नुकतीच पश्चिम बंगालला भेट दिली. तेथील अनुभव त्यांनी विद्यार्थांना सांगितले, तसेच त्यावरून आपले भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचे मत असल्याचे स्पष्ट केले. मी अगदी अल्पकाळ पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागामध्ये होतो. तेथील लोकांच्या अपेक्षा या आधीच कमी होत्या. त्या आता आणखीनच छोट्या होत असल्याचे बॅॅनर्जी यांनी सांगितले. आपल्या विद्यार्थीदशेमध्ये आंदोलनात भाग घेतल्याबद्दल १० दिवस तुरुंगात राहावे लागले होते, याची आठवण सांगताना बॅॅनर्जी म्हणाले. त्यानंतर, अनेकांनी मला करिअर संपल्याचे सांगितले. मात्र, मी आशा न सोडता प्रयत्न करीत राहिलो आणि आज येथे पोहोचलो, असेही त्यांनी स्पष्ट
केले.
अर्थव्यवस्थेबाबत कोणालाही दोष नाही
देशाच्या अर्थर्व्यवस्थेच्या सद्यस्थितीबद्दल बॅॅनर्जी म्हणाले की, अद्यापही ती २०१९पेक्षा खालच्या पातळीवर आहे. किती खालच्या ते मात्र आताच सांगता येणार नाही. यासाठी कोणी दोषी आहे, असे आपले मत नाही, असे सांगून बॅॅनर्जी यांनी कोरोनाच्या प्रभावामुळेच अर्थव्यवस्थेचा विकास खुंटल्याचे सांगितले.