नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ आधार अंकांची कपात केली असली, तरी त्यामुळे गुंतवणुकीत फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे अर्थव्यवस्थेतील गंगाजळीत वाढ होऊन महागाईचा पारा चढू शकतो. येणाऱ्या काही महिन्यांत महागाई ४ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला कसरत करावी लागू शकते, असेही जाणकारांना वाटते. सरकारसोबतच्या करारानुसार रिझर्व्ह बँक आता महागाई नियंत्रणास बांधील आहे. महागाई ४ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचे टार्गेट सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले आहे.भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढत असली, तरी खाजगी मागणी हे त्यामागील प्रमुख कारण आहे, खाजगी गुंतवणूक नव्हे, असे कोझिकोडे येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटमधील प्राध्यापक रुद्र सेनसर्मा यांनी सांगितले. चांगला मान्सून आणि वेतन आयोग यामुळे बाजारांतील मागणी यंदा आणखी वाढेल. वाहनांची विक्री याआधीच वाढली आहे. येणाऱ्या काळात मागणी आणखी वाढेल. त्याचा दबाव किमतींवर पडेल, असेही त्यांनी सांगितले. कर्जात बुडालेले उद्योजक नव्या प्रकल्पांत गुंतवणुकीसाठी झगडत आहेत. अशा परिस्थितीत भांडवली खर्च वर्तूळ (कॅपेक्स) पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारला हालचाली कराव्या लागतील. रिझर्व्ह बँकेच्या सप्टेंबरमधील बुलेटिनमध्ये कॅपेक्स २0१५-१६मध्ये १.५१ लाख कोटी होते. २0१४-१५च्या अंदाजपत्रकाच्या तुलनेत हे प्रमाण २४.७ टक्के कमी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गुंतवणूक वाढीची शक्यता कमीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2016 5:24 AM