अकोला : पारंपरिक पिकासोबतच शेतकरी नवे पीक प्रयोग करीत असून, वेगवेगळ्या पिकांचे प्रशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. यासाठीच कृषी विद्यापीठांनी वेगवेगळ्या पिकांचे व्यवस्थापन व पेरणीतंत्राचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. शासनाने या प्रशिक्षण प्रकल्पाला राबविण्यासाठी मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भाजीपाला पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची मागणी व गरज लक्षात घेऊन साकोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना भाजीपाला पीक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. भाजीपाला, वांगे, टोमॅटो, काकडी, कारले, दोडकी, चवळी, मिरची, भेंडी या अनेक भाजीवर्गीय पिकांची बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, ओलित, तण व्यवस्थापन कसे करावे, यासाठी शेतकऱ्यांचे वर्ग घेतले जात आहेत. भाजीपाला पिकावर विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्या किडीची ओळख, किडींचा जीवनक्रम आणि नियंत्रणाचे उपाय या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिके घ्यावीत, यासाठी प्रोत्साहन दिले जात असून, सेंद्रिय भाजीपाला व पीक संरक्षण कसे करावे, हे समजावून सांगितले जात आहे.
शासनाने शेती व उद्यानविद्या शेतकरी प्रशिक्षण प्रकल्प डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला दिला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोेत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. आता नव्याने चालू आर्थिक व पुढच्या आर्थिक वर्षासाठी राज्यात शेती व उद्यान विद्या बीजोेत्पादन केले जाणार आहे.
आता भाजीपाला पीक व्यवस्थापनाचे धडे!
पारंपरिक पिकासोबतच शेतकरी नवे पीक प्रयोग करीत असून, वेगवेगळ्या पिकांचे प्रशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत.
By admin | Published: September 25, 2015 10:05 PM2015-09-25T22:05:08+5:302015-09-25T22:05:08+5:30