नवी दिल्ली : दिवाळी म्हणजे नावीन्य आणि प्रकाशाचा उत्सव. चमचमीत, गोडधोड पदार्थ तयार करण्याचा सण. त्यामुळे या काळात धान्य आणि साखरेच्या दरावर सर्वसामान्यांचे अधिक लक्ष असते. किचनमध्येही खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणात गरज पडत असते. हे पाहून गृहिणी दिवाळीचे बेत आखत असतात. परंतु या दिवाळीत मात्र खाद्यतेलाच्या किमती सर्वसामान्यांना फारसे ‘टेन्शन’ देणार नाहीत. गेले काही महिने तेलांच्या किमतीही स्थिर आहेत. बाजारात त्यांचा पुरवठाही नीटपणे सुरू आहे. देशांतर्गत तेलांचे उत्पादन चांगले झालेले आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीही कमी आहेत. सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑयल इंडस्ट्री अँड ट्रेडचे (सीओओआयटी) अध्यक्ष सुरेश नागपाल यांनी सांगितले की, खाद्यतेलांच्या किमती स्थिर असल्याने सर्वसामान्यांनी या दिवाळीत निश्चिंत राहावे.
मागणी २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यतासध्या विविध ब्रँडच्या तेलांच्या किमती ४५ टक्क्यांनी खाली आल्या आहेत. सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या मागणीत २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. संपूर्ण वर्षभरात तेलाच्या किमतीत वाढ झालेली नाही. यंदा सोयाबीनची लागवड चांगली झाली आहे. आता सरसोची लागवड सुरू आहे. मागच्या वर्षी ११२ लाख टन इतके सरसोचे उत्पादन झाले. पुढील वर्षी सरसोचे उत्पादन ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.