मुंबई : नुकत्याच संपलेल्या २०२३च्या वर्षामध्ये देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून, सरत्या वर्षात तब्बल १५ कोटी २० लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) या संदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. २०२२ या वर्षामध्ये १२ कोटी ३२ लाख लोकांनी विमान प्रवास केला होता. त्या तुलनेत सरत्या वर्षी विमान प्रवाशांच्या संख्येत ८.३४ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
देशांतर्गत विमान प्रवासात इंडिगो विमान कंपनीने आपला अव्वल क्रमांक कायम राखत ६०.५ टक्क्यांची हिस्सेदारी मिळवली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानाने एकूण ९ कोटी १९ लाख लोकांनी प्रवास केला.
एअर इंडिया कंपनीच्या विमानाने एकूण १ कोटी ४७ लाख लोकांनी प्रवास केला. एअर इंडिया व सिंगापूर एअरलाइन्स या दोन विमान कंपन्यांची संयुक्त विमान कंपनी असलेल्या विस्तारा कंपनीच्या विमानाने १ कोटी ३८ लाख लोकांनी प्रवास केला.
अलीकडेच कायाकल्प झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीच्या विमानाने १ कोटी ८ लाख लोकांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
स्पाइस जेट कंपनीच्या विमानाने एकूण ८३ लाख ९० हजार लोकांनी प्रवास केला.
दीड वर्षापूर्वी भारतात विमान सेवा सुरू करणाऱ्या अकासा विमान कंपनीच्या विमानाने प्रवास करण्यास ६२ लाख ३२ हजार लोकांनी पसंती दिली.
एकट्या डिसेंबर महिन्यात १ कोटी
३७ लोकांचा प्रवास २०२३च्या शेवटच्या महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये देशात १ कोटी ३७ लोकांनी प्रवास केला. नाताळ व नववर्षाच्या सुट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासांच्या संख्येत ही वाढ झाली आहे.