नवी दिल्ली - अनेक धार्मिक विधींचा श्रावण महिना संपला आहे. आता काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी घरोघर सुरू आहे. पारंपरिक मार्गांनी खरेदीसोबत यंदाही ऑनलाइन खरेदीची जोरदार ‘क्रेझ’ दिसून येत आहे. ऑनलाइन कंपन्यांनीही यासाठी लागणारे जादा मनुष्यबळ रुजू करून घेतले आहे. शेअर बाजारातही तेजीचे वातावरण आहे. हा सर्व उत्साह पाहता यंदा ऑनलाइन खरेदीची उलाढाल ९० हजार कोटींच्या घरात जाईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
रेडसिअर कन्सल्टंड शॉपिंग या संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात यंदाच्या सणासुदीत ही उलाढाल विक्रमी ठरेल, असे सांगण्यात आले आहे. २०२२ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही उलाढाल १८ ते २० टक्के अधिक असेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
फॅशन, ब्युटी प्रोडक्टला मागणी - या अहवालानुसार कोरोनापूर्व काळात प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्स्पेंडिचरचा (पीएफसीई) दर प्रत्येक वर्षाला ८ ते ९ टक्के दरम्यान राहिला आहे.- कोरोना साथ तसेच नंतर युक्रेन-रशिया युद्ध यामुळे अर्थव्यवस्थेला सतत नुकसान सहन करावे लागले. २०२३ च्या मागील तिमाहीतही पीएफसीई दर कमीच राहिला.- परंतु, आता स्थिती सुधारली आहे. ब्युटी तसेच पर्सनल केअर आणि फॅशनमध्ये यंदा जोरदार खरेदी होऊ शकते.
इलेक्ट्रॉनिक्स खेरीज इतर वस्तूही खपणार मागील तीन महिन्यांत इलेक्ट्रॉनिक्ससह इतर श्रेणीमध्येही जोरदार मागणी दिसून आली. सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढत असतेच. परंतु, इतर वस्तूंना मागणी वाढणे हा अर्थव्यवस्थेसाठी शुभसंकेत आहे. याचाच अर्थ ग्राहकांकडून अधिकाधिक ब्रँड ऑनलाइन मागविण्याचा कल वाढतो आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होऊ लागली आहे.
१४कोटी ऑनलाइन शॉपिंग करणारे ग्राहक देशात आहेत. हे ग्राहक वेगाने वाढत आहेत. हे सर्व जण या हंगामात कमीतकमी एकदा तरी ऑनलाइन शॉपिंग करतील, असे गृहित धरण्यात आले आहे.
फेस्टिव्ह मंथचे १० वे वर्षे - यंदा ई-कॉमर्स फेस्टिव्ह मंथचे १० वे वर्ष आहे. - कोरोना साथीनंतर अर्थव्यवस्थेने गती घेतल्याने यंदा उलाढाल चांगली होईल, असा कयास आहे. - कोरोना साथीमुळे तीन वर्षे ऑनलाइन बाजारालाही मोठी झळ बसली होती.
खरेदीआधी खात्री करून घ्याऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असलेले अनेक प्लॅटफॉर्म आणि मोबाइलवर ही सुविधा देणाऱ्या अनेक अॅप्स यामुळे या खरेदीत आर्थिक फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ग्राहक फसव्या जाहिरातींना बळी पडत असतात. यामुळे ब्रँड आणि वेबसाईटची खात्री करूनच खरेदी करावी, यासाठी असे आवाहन करण्यात आले आहे.