Join us  

Video: "तुमचा आशीर्वाद राहू द्या"; मुकेश अंबानींचा साधेपणा, गावकऱ्यांसाठी बनले वाढपी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:04 PM

मुलगा अनंत यांच्या लग्नासोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात ५१ हजार गावकऱ्यांसाठी अंबानी परिवाराने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

अहमदाबाद - देशातील सर्वात श्रीमंत वक्ती आणि अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या शाही प्री-वेडिंग सोहळ्यासाठी देश-विदेशातील बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. अनंत यांचे लग्न जुलैमध्ये आहे, पण लग्नाशी संबंधित तीन दिवसांचे कार्यक्रम १ मार्चपासून सुरू होतील. गुजरातमधील जामनगर येथे होणाऱ्या या प्री-वेडिंग सोहळ्यात बडे उद्योगपती, अख्खे बॉलीवुड अन् क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले आहे. तत्पूर्वी येथील गावकऱ्यांसाठी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये, मुकेश अंबानी स्वत: वाढपी झाल्याचं दिसून आलं. 

मुलगा अनंत यांच्या लग्नासोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात ५१ हजार गावकऱ्यांसाठी अंबानी परिवाराने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी, जामनगरच्या जोगवाड गावातील सर्वच मंडळींना जेवणाचे निमंत्रण होते. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत अनेकांनी या जेवणाचे निमंत्रण स्वीकारून हजेरी लावली. विशेष म्हणजे येथे जेवणासाठी आलेल्यांना स्वत: मुकेश अंबानी यांनी वाढपी बनून जेवण दिले. कसे आहात, तुमचा आशीर्वाद राहू द्या, असे म्हणत मुकेश अंबानी गावकऱ्यांना जेवण वाढताना दिसून येतात. यावेळी, लहान मुलांसोबतही ते संवाद साधतात. त्यांच्या ताटात लाडू वाढतात. मुकेश अंबानींचा हा साधेपणा नेटीझन्सला चांगलाच भावला असून त्यांच्या या साधेपणाचं सोशल मीडियात कौतुक होत आहे. 

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि जगातील महत्त्वाच्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींचा हा साधेपणा आणि नम्रपणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा जेवण वाढतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून संस्कार आणि नम्रता काय असते, हे अंबानींकडून शिकावे, असेही कॅप्शन या व्हिडिओसोबत नेटीझन्स देत आहेत. 

विवाह सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या बहुप्रतीक्षित विवाहाची शुभ सुरुवात म्हणून अंबानी कुटुंबाने गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या एका विशाल मंदिर संकुलात १४ नवीन मंदिरे बांधली आहेत. कोरीव खांब, देवी-देवतांची शिल्पे, फ्रेस्को-शैलीतील चित्रे आणि पिढ्यानपिढ्यांच्या कलात्मक वारशातून प्रेरित वास्तुकला असलेले, हे मंदिर संकुल भारताची समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख विवाह सोहळ्याच्या केंद्रस्थानी ठेवते. प्रसिद्ध शिल्पकारांनी जिवंत केलेली, मंदिरातील कलाकृती जुनी तंत्रे आणि परंपरा वापरून साकारण्यात आली आहे. हा उपक्रम भारतीय वारसा, परंपरा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नीता अंबानी यांची दृष्टी दाखवून देतो. त्यात स्थानिक कारागिरांच्या अविश्वसनीय कौशल्यांवर प्रकाश पडतो.

कुटुंबात आनंदी आनंद

जामनगरमध्ये सध्या उत्सवाचे वातावरण आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबईत झाला. त्यापूर्वी रोका सोहळा पार पडला. हा विधी २९ डिसेंबर २०२२ रोजी राजस्थानमधील नाथद्वारा येथे असलेल्या श्रीनाथजींच्या मंदिरात झाला.  

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सलग्नगुजरात