नवी दिल्ली-
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीनं (LIC) नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या आयपीओ (IPO)चा ड्राफ्ट पेपर सेबीकडे जमा केला आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कंपनीकडे २१,५३९.५ कोटी रुपये रक्कम Unclaimed स्वरुपात होती, अशी माहिती आयपीओ ड्राफ्ट पेपरमध्ये नमूद करण्यात आली होती. खरं पाहता ही रक्कम अनेक मंत्रालयांच्या बजेट आणि अनेक कंपन्यांच्या बाजार मूल्यापेक्षाही अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर एलआयसीनं आता पॉलिसी धारकांना क्लेम प्रक्रिया सोयीस्कर होण्यासाठी बँक खात्याची माहिती अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जर तुमच्याकडे एलआयसीची कोणतीही पॉलिसी असेल तर तुम्हाला एक गोष्ट खूप चांगली माहित असेल की पॉलिसीची मुदत संपल्यानंतर त्यातील संपूर्ण रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे एलआयसीकडे तुमच्या बँक खात्याची योग्य माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरुन खातेधारकाला क्लेम सेटलमेंटच्यावेळी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. चुकीची माहिती दिल्यास एलआयसीकडून केलं जाणारं पेमेंट योग्य खात्यात जमा होणार नाही.
एलआयसीनं आता थेट जाहीरात काढून पॉलिसी धारकांना त्यांच्या बँक खात्याची माहिती अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरुन क्लेम प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. "पॉलिसी धारकांनी कृपया लक्ष द्यावं. वेळेवर क्लेम सेटलमेंट करण्यासाठी आम्हाला मदत करा. मेच्युरिटी डेट किंवा वारसदाराला पॉलिसीची रक्कम मिळवून देण्यासाठी योग्य कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर संपूर्ण माहितीनंतर संबंधित ब्रांचशी संपर्क साधा. तुमच्या बँक खात्याची माहिती उपलब्ध करून द्या. NEFT Mandate Form प्रत्येक कार्यालयात उपलब्ध आहे. तसंच एलआयसीच्या www.licindia.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे", असं एलआयसीकडून जारी करण्यात आलं आहे.
NEFT डिटेल्स ऑनलाइन पद्धतीनं जमा केले जाऊ शकतात असंही एलआयसीकडून सांगण्यात आलं आहे. यासोबतच क्लेम डिस्चार्ज फॉर्म आणि पॉलिसी डॉक्युमेंट सादर करावे लागतील. केवायसी सबमिट केल्यानंतर तुमचा निवासी पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी इत्यादी माहिती अपडेट करा, असंही एलआयसीकडून सांगण्यात आलं आहे.