Join us

LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:16 PM

LIC Big News: एलआयसीकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. या मोठ्या बातमीनंतर एलायसीच्या शेअर्सना पंख लागले आहेत.

LIC Big News: एलआयसीकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार बाजार नियामक सेबीनं १० टक्के पब्लिक शेअरहोल्डिंग मिळवण्यासाठी अतिरिक्त तीन वर्षांची मुदत दिली आहे. या घोषणेनंतर आज एनएसईवर एलआयसीच्या शेअरनं दिवसभरातील उच्चांकी पातळी गाठली. ११ वाजण्याच्या सुमारास तो ५ टक्क्यांहून अधिक वाढून ९७८ रुपयांवर पोहोचला. त्यानंतरही त्यात वाढ दिसून येत होती. 

गेल्या महिन्याभरात एलआयसीचे शेअर्स ६१ टक्क्यांनी वधारले आहेत. त्यात यंदा आतापर्यंत सुमारे १४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात त्यात ७२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ११७५ रुपये आणि नीचांकी स्तर ५६१.२० रुपये आहे. 

केव्हापर्यंत मिळणार हिस्सा 

सीएनबीसी १८ नं दिलेल्या वृत्तानुसार या मुदतवाढीच्या आधारे एलआयसी आता १६ मे २०२७ पर्यंत १० टक्के पब्लिक शेअरहोल्डिंग मिळवू करू शकते. सध्या एलआयसीमध्ये ३१ मार्च २०२४ पर्यंत पब्लिक शेअरहोल्डिंग ३.५ टक्के आहे. या आधारावर किमान १० टक्के सार्वजनिक हिस्सा गाठण्यासाठी सरकारला पुढील तीन वर्षांत आणखी ६.५ टक्के निर्गुतवणूक करावी लागेल. 

भारतातील सर्वात मोठा आयपीओ 

एलआयसीचा आयपीओ हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आहे. सरकारने २१,००० कोटी रुपयांच्या या इश्यूमध्ये केवळ ३.५ टक्के हिस्सा विकला होता. हा आयपीओ दोन वर्षांपूर्वी मे २०२२ मध्ये उघडण्यात आला होता. १७ मे रोजी लिस्टिंग झाल्यानंतर बहुतांश वेळ हा शेअर तोट्यात होता. एलआयसीच्या शेअर्सनं या वर्षाच्या सुरुवातीला ९४९ रुपयांच्या आयपीओ किंमतीचा टप्पा ओलांडून नवे विक्रम प्रस्थापित केले. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एलआयसीसेबीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार