Join us

LIC ची लहान मुलांसाठी भन्नाट पॉलिसी! फक्त १५० रुपये गुंतवा अन् मिळवा १९ लाख; पाहा, प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 12:02 PM

LIC च्या अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीवर पॉलिसीधारकांना खात्रीशीर परताव्यासह बरेच फायदेही मिळतात.

नवी दिल्ली: देशातील विमा क्षेत्रातील सर्वांत मोठी आघाडीची आणि विश्वासार्ह कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ. (LIC) अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी LIC कडे पॉलिसी असल्याचे सांगितले जाते. एलआयसी पॉलिसी म्हणजे उत्तम परताव्याचा विश्वास. LIC ने काळाशी सुसंगत राहून एकापेक्षा एक पॉलिसी आणल्या आहेत. LIC च्या ग्राहकांठी अनेक सुरक्षित पॉलिसी विमा बाजारात आहेत. 

LIC अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीवर पॉलिसीधारकांना खात्रीशीर परतावा मिळतो, त्याचबरोबर बरेच फायदे देखील मिळतात. विम्यासोबतच गुंतवणुकीवर कर सूटही मिळू शकते. एलआयसीची लहान मुलांसाठी एक योजना म्हणजे 'न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन'. या योजनेमुळे मुलाच्या शिक्षणाचा, लग्नाच्या खर्चाचा ताण दूर होऊ शकतो, असे म्हटले जाते. 

मुलाचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करू शकता

न्यू चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मुलाचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करू शकता. एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन दररोज फक्त १५० रुपये गुंतवून लाखोंचे फायदे देऊ शकतात. १८ व्या वर्षी पहिला हप्ता, दुसरा हप्ता मूल २० वर्षांचे झाल्यावर आणि तिसरा हप्ता मुलाच्चा २२ व्या वर्षी जमा केला जातो. तुमचे अपत्य २५ वर्षांचे झाल्यावर संपूर्ण रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यावेळी लाभार्थ्याला बोनससह ४० टक्के रक्कम मिळते.

मुदतपूर्तीच्या वेळी व्याजासह एकरकमी रक्कम 

LIC च्या या पॉलिसीमध्ये किमान विम्याची रक्कम १,००,००० रुपये आहे, तर कोणतीही कमाल मर्यादा नाही. पेमेंट हप्त्यांमध्ये न घेतल्यास, मुदतपूर्तीच्या वेळी व्याजासह एकरकमी रक्कम दिली जाते. पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा शून्य ते १२ वर्षे आहे. गुंतवणूकदार एकूण रकमेच्या ६० टक्के रक्कम हप्त्यांमध्ये आणि ४० टक्के रक्कम बोनससह मॅच्युरिटीच्या वेळी घेऊ शकतात.

दरम्यान, जर तुम्ही या योजनेत दररोज १५० रुपये गुंतवायला सुरुवात केली, तर वर्षाला सुमारे ५५,००० रुपये जमा होतील. २५ वर्षात तुम्हाला एकूण १४ लाख रुपये जमा करावे लागतील. त्या बदल्यात तुम्हाला मॅच्युरिटीवर १९ लाख रुपये मिळतील. 

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक