बाजार नियामक सेबीनं (SEBI) १९ मार्च २०२४ रोजी एलआयसी (LIC) कर्मचाऱ्याचा फ्रन्ट रनिंगमध्ये सहभाग असल्याची पुष्टी केली. यामध्ये अंतर्गत माहिती वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आली. फ्रन्ट-रनिंग म्हणजे किंमतीतील बदलांपासून नफा मिळवण्यासाठी प्रलंबित व्यवहारांच्या आधारे ट्रेड करणं. एप्रिल २०२३ मध्ये सेबीच्या तपासामुळे पाच संस्थांवर बंदी घालण्यात आली आणि २.४४ कोटी रुपयांची अवैध कमाई जप्त करण्यात आली.
सेबीनं नुकत्याच केलेल्या पुष्टीनुसार, एलआयसी कर्मचाऱ्यानं सेबीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. एलआयसीनं बायोमेट्रिक एन्ट्री, सीसीटीव्ही पाळत ठेवणं आणि व्यापार क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मर्यादा यासारख्या सुरक्षा उपायांसह प्रतिसाद दिला. भविष्यातील फ्रन्ट रनिंग घटना रोखणं आणि बाजारातील निष्पक्ष व्यवहार सुनिश्चित करणं हा यामागील उद्देश आहे.
फ्रन्ट रनिंग म्हणजे काय?
भांडवली बाजारात काम करणाऱ्या लोकांच्या मते, फ्रन्ट रनिंग अॅक्टिव्हिटी त्याला म्हणतात, जेव्हा एखादा ब्रोकर किंवा गुंतवणूकदार कोणत्या ट्रेडमध्ये सहभागी होतो, कारण त्याला पहिल्यापासून त्या कंपनीची मोठी डील होणार आहे आणि त्यामुळे शेअर्सचे भाव वाढू शकतात याची माहिती असते.
फ्रन्ट रनिंगला फॉरवर्ड ट्रेडिंग किंवा टेलगेटिंग असंही म्हणतात. जर एखाद्या स्टॉक ब्रोकरला किंवा गुंतवणूकदाराला कंपनी मोठी डील करणार याची माहिती मिळाली, तर ते बरेच शेअर्स अगोदर खरेदी करतात आणि डील जाहीर झाल्यानंतर, स्टॉकची किंमत वाढल्यावर ते विकून मोठा नफा कमावतात. जेव्हा एखादा अॅनालिस्ट किंवा ब्रोकर वैयक्तिक खात्यातून शेअर खरेदी करतो किंवा विकतो आणि नंतर तो शेअर खरेदी किंवा विक्री करण्याबद्दल त्याच्या क्लायंटला सल्ला अथवा माहिती देतो तेव्हादेखील फ्रन्ट रनिंग देखील होऊ शकते.
... तर सेबी करते कारवाई
भांडवली बाजाराच्या नियमांनुसार, फ्रन्ट रनिंग हे बेकायदेशीर व्यवसाय आहे कारण त्यात सामान्य लोकांसाठी उपलब्ध नसलेल्या माहितीचा वापर करून नफा कमावण्याचाही समावेश आहे. स्टॉक ब्रोकर्स, ट्रेडर्स किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्या कंपनीच्या कामकाजाच्या योजनेबद्दल आधीच माहिती असते. या माहितीचा वापर करून गुंतवणूक करणं आणि पैसे मिळवणं हे शेअर बाजाराच्या नियमांच्या विरुद्ध आहे, त्यामुळे अशी प्रकरणं शोधून काढल्यानंतर सेबी कारवाई करते.